तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांचा काला सिनेमा आज प्रदर्शित झाला. अनेक वाद-विवाद झाल्यानंतर सिनेमा प्रदर्शित झाला असून चेन्नई आणि इतर राज्यांमध्ये रजनीकांत यांच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. या गर्दीत अनेकांचे लक्ष वेधून घेतले ते एका जपानी जोडप्याने. हे जोडपे खास रजनीकांतचा काला सिनेमा पाहण्यासाठी जपानहून चेन्नईमध्ये आले. ते स्वतःला रजनीकांतचे सर्वात मोठे चाहते मानतात. त्यांनी कालाचा पहाटे ४.३० वाजताचा पहिला शो पाहिला. कालाचा पहिल्या दिवसाचा शो पहाटे ४.०० वाजल्यापासून सुरू झाले आहेत. या जपानी जोडप्याने कालाचे टी-शर्ट घातले होते. रजनीकांतच्या इतर चाहत्यांप्रमाणे या दोघांच्याही चेहऱ्यावर सिनेमा पाहण्याची उत्सुकता ओसंडून वाहत होती.

या जोडप्यातील यासुधाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून ते रजनीकांतचे सिनेमे पाहायला भारतात येत आहे. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही पण त्यांना तमिळ कळते. या जोडप्यासाठी रजनीकांत देवच आहे. म्हणूनच की काय सकाळी ४.३० चा शो पाहिल्यानंतरही या जोडप्याने कालाचे अजून दोन शो वेगवेगळ्या चित्रपटगृहात पाहिले.

यासुधा पुढे म्हणाला की, त्याला रजनीकांतची स्टाइल, अॅक्शन आणि साधेपणा फार भावतो. याचसाठी एंथिरन, कोच्चडियन आणि कबाली हे सिनेमे त्याने भारतात येऊन पाहिले आहेत. खास भारतात येऊन रजनीकांतचे सिनेमे पाहण्यामागचं कारण त्याला विचारले असता तो म्हणाला की, जपानमध्ये फार उशीरा भारतीय सिनेमा प्रदर्शित होतो. तेवढा वेळ तो वाट पाहू शकत नाही, शिवाय त्याला संपूर्ण जगासोबत पाहायचा असतो.