एखाद्या कलाकारावर चाहते किती प्रेम करतात हे वेगळं सांगायला नको, त्यातून अशा कलाकारांचे निस्सिम चाहते त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटल्यावर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायलाच जाणारच हे नक्की. दक्षिणेकडे रजनीकांत यांची क्रेझ खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे म्हटल्यावर तो पाहण्यासाठी चक्क ऑफिसनां सुट्ट्या दिल्याची उदाहरणं आपण पाहिली असतील. इतकंच कशाला रजनीकांत यांच्या प्रतिमांवरदेखील दुग्धाभिषेक झाल्याची उदाहरणं असतील. पण चित्रपटाचं किंवा एखाद्या कलाकांरावषयी इतकं पराकोटीचं प्रेम फक्त भारतातच पाहायला मिळतं असं मुळीच नाही.

नुकताच टॉम क्रूझचा Mission Impossible Fallout प्रदर्शित झाला. पॅरामाऊट पिक्चरनं या चित्रपटाचं स्क्रिनिंग नॉर्वेमधल्या पुलपिट क्लिफवर करायचं ठरवलं. पुलपिट ही सर्वात उंच कडा असून त्याची उंची २ हजार फूट आहे. या चित्रपटातलं एक साहसी दृश्य पुलपिट कडेवर शूट करण्यात आलं आहे. त्यामुळे इथेच चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी याची जाहिरातबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे हजारो फुट उंच असलेली कडा सर करून मग तिथेच चित्रपट पाहण्याची कल्पना सगळ्यांनाच आवडली. जाहिरातबाजी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तिकिटांची विक्री झाली.

ठराविक २ हजार चाहत्यांना पुलपिटवर चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. मग काय चार तासांचा ट्रेक करत हजारो चाहते कडेच्या सर्वात वरच्या भागात पोहोचले. तिथे मोठी स्क्रिन लावण्यात आली होती. जर चित्रपटांसाठी टॉम स्वत:चा जीव धोक्यात घालू शकतो मग आपण का नाही? असं म्हणत अनेकांनी हा रोमांचकारी अनुभव घेतला.