अनेक वर्ष मराठीसह विविध भाषांमधील चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले, पण कुठेतरी थांबले पाहिजे. स्वतच्या आवाजाची ओळख रसिकांच्या मनात राहिली पाहिजे, त्यामुळे आता चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणे बंद केले असल्याचे मत ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केले.
सीडी प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने त्या नागपुरात पत्रकारांशी बोलत होत्या. जुन्या गायकांची गाणी त्यांच्या आवाजावरून ओळखली जात असताना त्यांच्या आवाजाची ओळख आजही रसिकांच्या मनात आहे. चित्रपटक्षेत्रात अनेक वर्षे पाश्र्वगायन केले. या क्षेत्रात स्वतची ओळख निर्माण झाली होती आणि तीच पुढे कायम राहावी म्हणून कुठे तरी थांबले पाहिजे, असे वाटल्याने पाश्र्वगायन बंद करण्याचा निर्णय घेतला. अनेक संगीत दिग्दर्शक आजही आग्रह करतात. मात्र, आता ते शक्य नाही. चित्रपटांसाठी गात नसले तरी भक्तीगीतांचे कार्यक्रम आजही करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रिअ‍ॅलिटी शोबाबत बोलताना पौडवाल म्हणाल्या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेले काही गायक कलावंत अतिशय चांगले आहेत. मात्र, पैसा आणि प्रसिद्धी मिळू लागली की, ती भरकटत जातात. लहान मुलांना या शोमध्ये पालकांनी उतरवू नये, ज्या वयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्याची गरज आहे त्या वयात त्यांना अशा रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाठवतात. खरे तर, १८ वर्षांखालील मुलांना अशा शोमध्ये प्रवेश देऊ नये.
नव्या पिढीला गुरुप्रती आदर राहिलेला नाही. ज्या गुरुंकडे संगीताचे शिक्षण घेतले त्यांची गीते सादर करून त्यात बदल केले जातात आणि हे चुकीचे आहे. एखाद्या गाण्याची नक्कल करून गाणे शिकता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.