दाक्षिणेकडील अनेक राज्यात लाडक्या सुपरस्टारच्या चित्रपट प्रदर्शनावेळी त्यांच्या कट्आउट्सवर दुग्धाभिषेक करण्याची पद्धत कित्येक वर्षांपासून सुरू आहे. रजनीकांत किंवा अन्य सुपरस्टारच्या चित्रपट प्रदर्शनावेळी अनेक चाहते हजारो लीटर दूधाचा अभिषेक करतात. मात्र अभिषेकासाठी काही चाहते दूध विक्री केंद्रावरून मोठ्या प्रमाणात चोरी करत असल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनावेळी होणाऱ्या दूध चोरीचं वाढतं प्रमाण आता दूध विक्रेत्यांची मोठी डोकेदुखी बनत चालली आहे त्यामुळे ‘पाल अभिषेकम्’ (दुग्धाभिषेक)वर कायमस्वरूपी बंदी घालावी तसेच दूध विक्री केंद्रावर पोलिसांचा पहारा ठेवावा अशी मागणी दूध विक्रेता संघटनेनं केली आहे.

‘पाल अभिषेकम्’ वर बंदी घालावी, दूधाची नासाडी थांबवावी तसेच पहाटेच्या वेळी दूध केंद्राला सुरक्षा पुरवावी अशा तीन प्रमुख मागण्या दूध विक्रेता संघटनेनं केल्या आहे. तामिळनाडू मिल्क डिलर्स वेल्फेअर असोशिएशननं पोलीस स्टेशनमध्ये यासंबधी तक्रार दाखल केली आहे. तसेच कट आऊट्सवर होणारा ‘पाल अभिषेकम्’ थांबवण्याची मागणी चाहत्यांना करावी अशी विनंतीही त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्यांकडे केली आहे. अभिनेत्यांनी केलेलं आवाहन ऐकून चाहते दूधाची नासाडी आणि चोरी करणं थांबवतील अशी आशा संघटनेला आहे.

‘वंधा राजावथन वरूवेन’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा अभिनेता सिम्बूनं आपल्या कटआऊटवर दुग्धाभिषेक करू नये अशी विनंती चाहत्यांना केली आहे. पहाटेच्यावेळी शहरात दूधाच्या गाड्या येतात त्यानंतर दूधाच्या पिशव्या दूध केंद्रापर्यंत पोहोचवल्या जातात. या दरम्यान चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात दूधाची चोरी केली जाते ही बाब विक्रेत्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

दाक्षिणेतले स्टार रजनीकांत, अजित, विजय यांच्या चित्रपट प्रदर्शनावेळी दूध चोरीचे प्रकार सर्रास होतात. ‘सुपरस्टारच्या चित्रपट प्रदर्शनावेळी त्यांचे चाहते दूधाच्या पिशव्या बिंधास्त चोरून नेतात यामुळे दूध विक्रेत्यांचं आर्थिक नुकसान होतंच पण दूधाची नासाडीही होते . रजनीकांत, अजित, विजय यांसारख्या कलाकरांना आम्ही यासंबधीची माहिती देत पाल अभिषेकमवर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्या अशी विनंतीही केली पण कोणत्याही अभिनेत्यानं यासाठी साधे प्रयत्नही केले नाही’ अशी खंतही दूध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष पोन्नूस्वामी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेसटशी बोलताना सांगितली.