करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या वाढत्या संक्रमणामुळे देशवासीयांची अवस्था फारच बिकट झली आहे. या प्रतिकूल परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी क्रेंद सरकारने २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावरुन अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या पॅकेजची तुलना तिने रशियन बाहुलीशी केली आहे.

“सरकारने २० लाख कोटींची घोषणा केली. ही घोषणा ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर रशियन बबुष्का बाहुली आली. या बाहुलीला एका मोठ्या खोक्यात ठेवलं जातं. परंतु त्या खोक्यातून एक लहानशी बाहुली बाहेर येते.” अशा आशयाचे ट्विट फराह खान अली हिने केले आहे. फराह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती प्रतिक्रिया देत असते. या पार्श्वभूमीवर तिचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. दरम्यान या पॅकेजवरुन वाद विवाद सुरु झाले आहेत. काही अर्थतज्ञ व विरोधकांनी या पॅकेजमधून देशाला काहीही फायदा होणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. तर भाजपा समर्थकांनी मात्र ही आजवरची सर्वात मोठी मदत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.