फरहान अख्तरची पूर्वाश्रमीची पत्नी अधूना अख्तरच्या बी- ब्लंट सलॉनमध्ये वित्त व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या कीर्ती व्यासची हत्या करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून कीर्ती बेपत्ता होती. याबाबत फरहान अख्तरने सोशल मीडियावर कीर्तीच्या बेपत्ता असल्याची पोस्ट केली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता कीर्तीची हत्या झालेचे मुंबई पोलिसांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणात एका महिलेसह दोन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी कीर्तिसोबत सलॉनमध्ये काम करायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तीने एका आरोपीला त्याच्या खराब कामाबद्दल नोटीस दिली होती. हा राग मनात धरून त्या आरोपीने अजून दोघांच्या मदतीने कीर्तीची हत्या केली. तपासादरम्यान पोलिसांना आरोपींच्या गाडीमध्ये जे रक्ताचे अंश मिळाले ते कीर्तीच्या कुटुंबीयांच्या रक्ताशी जुळले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी साजवानी आहे.

सिद्धेश ताम्हणकर बी- ब्लंट सलॉनमध्ये अकाऊंट एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करत होता, तर खुशीही अॅकॅडमी मॅनेजरच्या पदावर होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिद्धेश आणि खुशी हे रिलेशनशिपमध्ये आहेत. १६ फेब्रुवारीला दोन्ही आरोपी कीर्तिच्या घरासमोर गाडी घेऊन उभे होते. दोघांनी कीर्तीला सांगितले की, आम्ही ऑफिसलाच जात आहोत तर तुलाही ड्रॉप करतो.

कीर्ती बेपत्ता झाल्याचा तपास सुरू झाल्यावर आरोपींनी सांगितले की, त्यांनी कीर्तीला ग्रँट रोड स्टेशनवर सोडले होते. पण नंतर सीसीटीव्ही फुटेजवरून कळले की कीर्ती तिकडे पोहोचलीच नव्हती. त्यानंतर आरोपींवर संशय वाढत गेला आणि त्यांना अटक करण्यात आली. या तपासात पुढे आले की, सिद्धेश आणि खुशीने कीर्तीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. पोलीसांना कीर्तीची मृतदेह मिळाला नसून सध्या यासंदर्भात तपास सुरू आहे.