अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या घराणेशाहीवर वाद सुरू झाला. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांसारख्या कलाकारांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. त्यातच आता अभिनेता फरहान अख्तर याने घराणेशाहीवर प्रतिक्रिया दिली आहे. स्टार किड्सना पहिली संधी मिळते, मात्र त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वावर व प्रतिभेवरच पुढचं काम मिळतं, असं तो म्हणाला.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फरहान अख्तर म्हणाला, “पहिली गोष्ट म्हणजे सुशांतने का आत्महत्या केली आणि कशी केली याबद्दल चर्चा करण्याची ही वेळ योग्य नाही. दुसरी म्हणजे, दिग्दर्शकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्टार किड्सना फार मेहनत करावी लागत नाही ही गोष्ट खरी आहे. पण ही इंडस्ट्री यश आणि अपयश या दोनच गोष्टींवर पूर्णपणे चालते. स्टार किड्सना विशेषाधिकार मिळणं ही काही वाईट गोष्ट नाही. कारण अखेर प्रतिभावान कलाकारच इथे टिकतात. त्यांनाच यशाची चव चाखायला मिळते. या इंडस्ट्रीमध्ये सर्वच बाहेरून आलेल्यांना वाईट पद्धतीने वागवलं जातं असं नाही. पण इथले सगळेच जण त्यांना आपलंसं करून घेतात असंही नाही.”

फरहान अख्तर हा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर व अभिनेत्री शबाना आझमी यांचा मुलगा आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘द स्काय इज पिंक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.