बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे आतापर्यंत अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. प्रेक्षकांचा कल कोणत्या चित्रपटाकडे सर्वाधिक असतो हे जाणून ते चित्रपटाची निर्मिती करत असल्याचं दिसून येतं. ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भा’ग यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी देशातील महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं आहे. आता राकेश ओमप्रकाश मेहरा पुन्हा एकदा असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मेहरा यांचा आगामी चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा प्रकारात मोडणारा असून त्यांनी या चित्रपटासाठी फरहानची निवड केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मेहरा आणि फरहान तब्बल सहा वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. बॉक्सिंग या खेळावर आधारित या चित्रपटाचं नाव ‘तुफान’ असं आहे.

‘तुफान’मध्ये फरहान एका बॉक्सरची भूमिका वठविणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिंधवानी आणि फरहान करत आहेत. तर चित्रपटाची कथा अंजुम राबाबली लिहिणार आहेत. विशेष म्हणजे फरहानने या चित्रपटासाठी बॉक्सिंगचा सराव सुरु केला असून निर्मिती प्रक्रियेलादेखील सुरुवात झाली आहे.