बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी ड्रग्स चॅट समोर येताच सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांवर जोरदार टीका सुरु झाली. नुकताच भाजपाचे खासदार रवी किशन यांनी बॉलिवूड इंडस्ट्री ड्रग्सला बळी पडली असल्याचे म्हटले. त्यावर काही लोकं इंडस्ट्रीला बदनाम करत असल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केले. ज्या ताटात खातात, त्याच ताटात छेद करतात, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली. त्यांच्या या टीकेवर बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने ट्विट करत त्याचे मत मांडले आहे.

फरहानने ट्विटमध्ये जया बच्चन यांची प्रशंसा केली आहे. ‘आदर, जेव्हा कधी गरज असते तेव्हा त्या त्यांचा आवज उठवतात’ असे फरहानने म्हटले आहे. त्याचबरोबर त्याने हात जोडलेले इमोजी वापरले असून हॅशटॅग वापरला आहे.

काय म्हणाल्या जया बच्चन?
“केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही. चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे लज्जास्पद आहे.” रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. यावरूनच “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत जया बच्चन यांनी टीका केली.