हरियाणातील मेवातमध्ये गर्भवती शेळीवर सामुहिकरित्या झालेल्या अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे पुन्हा एकदा प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मुक्या जनावरांना न्याय मिळवून देण्यासाठी सध्या सोशल मीडियावर #JusticeforGoat हा ट्रेंड सुरु झाल्याचा पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे घडलेल्या या घृणास्पद कृत्यावर बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. त्यातच अभिनेता फरहान अख्तरने ट्विट करत या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

एका सात वर्षांच्या शेळीसोबत झालेल्या अनैसर्गिक कृत्यामुळे तिचा मृत्यू झाला असून पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी हे स्थानिक असून ते सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या घटनेची सर्व स्तरातून चर्चा होत असून देशात हे काय सुरु आहे असा प्रश्न फरहानने विचारला आहे.

‘भारतासारख्या पुरुषप्रधान देशामध्ये अजूनही महिला आणि लहान मुलं सुरक्षित नाही आणि आता त्यात भर पडली आहे ती म्हणजे मुक्या जनावरांच्या सुरक्षेची. आपल्या येथे प्राणीदेखील सुरक्षित नाहीत का ? एका शेळीवर अत्याचार होतो ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे आता प्राण्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरजं आहे’, असं ट्विट फरहानने नुकतंच केलं आहे.

पुढे तो असंही म्हणाला, ‘आपल्याच शिक्षणात आणि संस्कारांमध्ये कुठेतरी कमतरता आहे. त्यामुळेच या दुर्दैवी घटना घडत आहेत. पण हे कुठेतरी थांबायला हवं’. फरहान कायमच सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतो. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच त्याच्यावर आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. फरहान लवकरच प्रियांका चोप्राबरोबर ‘द स्काय इज पिंक’मध्ये झळकणार आहे.