देशात सध्या करोनाची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत करोनाची स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपुरं पडत असल्याचा आरोप सातत्याने वेगवेगळ्या स्तरातून करण्यात येतोय. करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला लोकांचे प्रश्न नको झाले आहेत. सरकार त्यांना अटक करुन त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करतेय, असे आरोप करण्यात येत आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सरकारवर चांगलाच भडकला आहे. सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढणारी पोस्टच फरहान अख्तरने लिहिली आहे.

फरहान अख्तर हा बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता, दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. देशभरात घडणाऱ्या विविध घटनांवर तो आपलं मत अगदी रोखठोकपणे व्यक्त करत असतो. यंदा त्याने करोनाच्या विषयावरून सरकारवर आगपखाड केली आहे. फरहानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्याने लिहिलं, “सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सरकारवर टीका करू शकत नाही, मग तुम्ही कोणत्याच सरकारी धोरणांवर टीका करू शकत नाही, मग तुम्ही करोना विषाणू विरोधात लढण्यासाठी सरकारने आखलेल्या रणनितीवर ही टीका करू शकत नाही, मग तुम्ही गाईच्या शेणावरही टीका करू शकत नाही…”, अशा कडव्या भाषेत फरहानने सरकारला धारेवर धरलंय.

दिल्लीमध्ये ‘मोदी जी, आपच्या मुलांच्या लशी परदेशी का पाठवल्या?’ असा प्रश्न विचारणारे पोस्टर लावण्यात आले होते. मोदी सरकारवर टीका करणारे हे पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 25 जणांना अटक केली होती. पोस्टरमध्ये कोरोना लशींच्या पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. यावरून अनेक स्तरातून सरकारच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्या टीका होऊ लागल्या. यात आता फरहान अख्तरने देखील आपला राग व्यक्त केलाय.

फरहानचे हे ट्विट सध्या वेगाने व्हायरल होतंय. त्याच्या फॅन्सनी या पोस्टवर कमेंट्स करत त्याचं कौतूक देखील केलंय. नेहमीप्रमाणे त्याच्या ट्विटवर ट्रोल करणारे कमेंट्स देखील दिसून येत आहेत.