गेल्या कित्येक महिने चित्रपटांपासून दूर असलेला फरहान अख्तर एका हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. हॉलिवूड चित्रपटातील एका सीन ब्लर केल्यामुळे फरहानने सेन्सॉर बोर्डावर नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच त्याने ट्विटरच्या माध्यमातून त्याचा रागही व्यक्त केला आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फोर्ड वर्सेस फरारी’ हा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार असून भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटामध्ये काही सीनला सेन्सॉर बोर्डाने कट दिले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटामधील एका सीनमध्ये मद्याच्या ब्रॅण्डचं नाव ब्लर करण्यात आलं आहे. त्यासोबतच काही संवाद म्यूट करण्यात आले आहेत. त्यामुळेच फरहान सेन्सॉर बोर्डावर प्रचंड संतापला आहे.


हा सीन ब्लर करण्यामागे आणि काही संवाद म्यूट करण्यामागे चित्रपटाच्या टीमने काही कारणं असल्याचं सांगितलं. “सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या (सीबीएफसी) गाइडलाइननुसार, आम्ही मद्याच्या ब्रॅण्डचं नाव दाखवू शकत नाही. त्यामुळे आम्हाला हा सीन ब्लर करावा लागला. मात्र त्यांनी आम्हाला मद्याचा ग्लासदेखील ब्लर करायला का सांगितला हे समजलं नाही. परंतु सेन्सॉर बोर्डाची कमिटी लवकरच चित्रपटामध्ये काही कटस् देऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्याची परवानगी देतील. या साऱ्याप्रकारामध्ये आम्ही काही करु शकत नाही”, असं चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, फरहानने ट्विट करुन आगपाखड केल्यानंतर अनेक भारतीय नेटकऱ्यांनीदेखील त्यांचा संताप व्यक्त केला. फोर्ड वर्सेस फरारी या चित्रपटाचं दिग्दर्शन जेम्स मॅनगोल्ड यांनी केलं असून हा चित्रपट यंदा ऑस्करसाठी नामांकित करण्यात येऊ शकतो अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.