पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या काळात ‘मन की बात’मध्ये कौतुक केलेले अकोला जिल्ह्यातील शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर न्यायासाठी मरणाच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. महामार्ग भूसंपादन मोबदलाप्रकरणी सहा प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात राऊत यांचाही समावेश असून, महाजनादेश यात्रेनिमित्त अकोल्यात असलेले मुख्यमंत्री या प्रकल्पग्रस्तांना न्याय देतील का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

महामार्ग भूसंपादनात वाढीव मोबदल्यासाठी बाळापूर तालुक्यातील शेतकरी पाच वर्षांपासून लढा देत आहेत. असमान दराने मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे. वेगवेगळय़ा तीन नियमांनुसार मोबदला निश्चित झाल्याने काही शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळाला. मूल्यांकनामध्ये त्रुटी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रकल्पग्रस्तांनी दाद मागूनही न्याय मिळाला नाही. याच सुनावणीदरम्यान मोबदला योग्य असल्याचे सोमवारी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर निराश झालेल्या सहा शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात राऊत यांचा समावेश आहे.

राऊत यांचे महामार्गावर ‘मराठा’ नावाचे हॉटेल आहे. नोटाबंदीच्या काळात रोकड अडचणीमुळे त्यांनी प्रवासी उपाशी राहू नयेत म्हणून ‘जेवण करून जा, पैसे पुढच्या वेळी द्या’ हा उपक्रम राबवला. शेकडो प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला. सामाजिक जाणिवेतून राऊत यांनी केलेल्या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये घेऊन त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. चौपदरीकरणात राऊत यांच्या हॉटेलची जागा गेली. पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या शेतकऱ्यालाही अखेर न्यायासाठी हा मार्ग पत्करावा लागला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शेतकरी महिलेकडूनही विषप्राशन

वाढीव मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त भरत टकले यांनी वर्षभरापूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांची पत्नी अर्चना या मोबदल्यासाठी लढा देत होत्या. त्यांनीही सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. याच प्रकरणातील आशीष हिवरकर यांनी विष घेतल्याचे कळताच त्यांचे वडील मदन हिवरकर यांना हृदयविकाराचा झटका आला.

या घटनेवरून युती सरकारच्या अनेक दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. सरकारचे दावे फोल असल्याचे स्पष्ट होते. थोडी तरी संवेदना शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत या शेतकऱ्यांची भेट घेऊन क्षमा मागावी आणि त्यांना न्याय द्यावा. सरकारी अनास्थेमुळे शेतकऱ्यांवर विषप्राशन करण्याची वेळ ओढावते, हे संतापजनक आहे.

अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

भूसंपादन मोबदलावाटपात आमच्यावर अन्याय झाला. वारंवार पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. ‘एक रुपयाचाही वाढीव मोबदला देऊ शकत नाही, तुम्हाला वाटेल ते करा,’ असे उद्दाम उत्तर अधिकारी देतात. शासनाने आम्हाला न्याय द्यावा.

– मुरलीधर राऊत, प्रकल्पग्रस्त.