भयपटांचा बादशाह असलेल्या दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉकच्या ‘सायको’ या चित्रपटाने इतिहास घडवला. हॉलीवूड सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाने आवडीने भयपट पाहणारा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. साठच्या दशकांत प्रेम, युद्ध, सामाजिक समस्या यांसारख्या पारंपरिक विषयांवरच चित्रपट निर्मिती केली जात असताना हिचकॉकने या चौकटी मोडून नवीन धाटणीचे, भीती, थरार, रहस्य आणि गूढ कथांनी भरलेले चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्याने केलेल्या त्या प्रयोगांकडे आजही विशेष कौतुकाने पाहिले जाते. आणि याचाच विचार करून दिग्दर्शक अ‍ॅलेक्झांडर फिलिपने हिचकॉकच्या अभूतपूर्व कर्तृत्वाचे दाखले देणाऱ्या एका माहितीपटाची निर्मिती केली आहे. या माहितीपटाला इंटरनेटवर भरभरून प्रतिसाद मिळत असून त्यामुळे हिचकॉकमधील कलागुणांची नव्याने ओळख होऊ लागली आहे. हा माहितीपट १९६०साली प्रदर्शित झालेल्या ‘सायको’ या चित्रपटावर आधारित आहे. अगदी मूठभर तंत्रज्ञान हाताशी असलेल्या काळात या उत्कंठावर्धक चित्रपटाची निर्मिती नेमकी कशी झाली? याचा उलगडा या माहितीपटातून होतो. शिवाय चित्रविचित्र आवाजांची निर्मिती, भय निर्माण करण्यासाठी प्रकाश व अंधाराचा केलेला योग्य वापर व चित्रपट निर्मिती दरम्यान आलेल्या विविध समस्या यांवर प्रकाश टाकणारा हा माहितीपट आहे. या चित्रपटात काम केलेल्या काही कलाकारांच्या मते अनेकजण हा चित्रपट अध्र्यावरच सोडण्याच्या तयारीत होते. कारण दिग्दर्शकाच्या हट्टीपणामुळे तो चित्रपट ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ लांबवला जात होता. आणि तरीही हिचकॉक मात्र आपल्या विचारांवर ठाम होता. त्याने दोन दोन मिनिटांच्या चित्रीकरणासाठी तब्बल ७२ शॉट्स आणि ५० पेक्षा जास्त रिटेक्स घेतले होते. परंतु त्याने घेतलेल्या या मेहनतीचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र चीज झाले. परिणामी त्यातील कलाकारांच्या अभिनयाचे जगभरातून कौतुक होऊ लागले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पण त्यामागे खरे श्रेय होते ते अल्फ्रेड हिचकॉकचेच. एकंदरीत या माहितीपटात ‘सायको’ या चित्रपट निर्मितीमागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न फिलिपने केला आहे.