‘फॅशनिस्टा’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर किती चांगली मैत्रीण आहे, याचा प्रत्यय नुकताच आला. तिच्यासोबत मैत्री केल्याचा फायदा सध्या फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिला होत आहे. मसाबाने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या फटाके विक्रिवरील बंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. दिल्ली एनसीआर परिसरात फटाके विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्यणाचं तिने समर्थन केलं होतं. या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल काही आक्षेपार्ह प्रतिक्रियांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो याची तिला कल्पनाही नसावी.

फटाके बंदीच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या मसाबावर नेटकऱ्यांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी असल्यामुळेही तिच्यावर निशाणा साधण्यात आला. नेटकऱ्यांकडून होणारा विरोध पाहता शेवटी मसाबाने त्यांना कठोर शब्दांत उत्तर देत सर्वांच्या चपराक लगावली.

ट्विटर अकाऊंटवरुन मसाबाने एक लांबलचक संदेश लिहित नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांविषयी तिचं मत मांडलं. “नुकतच मी फटाके विक्रीवरील बंदीचं ट्विट रिट्विट केलं. ही अतिशय सर्वसामान्य बाब होती. पण, काही क्षणांतच त्यावरुन माझ्यावर टीका करण्यास आणि माझी खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली. माझ्या आईवडिलांच्या संबंधांवरुन ‘अनैतिक पाल्य’ म्हणत मला निशाणा करण्यात आलं. पण, दोन कर्तृत्त्ववान व्यक्तींची मी मुलगी आहे. माझं स्वत:चंही अस्तित्व असून, ते मी सिद्धही केलं आहे. दहा वर्षांची असल्यापासूनच अनेकांनी माझी यावरून खिल्ली उडवली जातेय. माझ्या कामातून आणि समाजाला मी दिलेल्या योगदानातून माझी नैतिकता स्पष्ट होत आहे. पण, तरीही मला अशा शब्दांनी संबोधणं तुम्हाला गौरवास्पद वाटत असेल तर त्याला माझी काहीच हरकत नाही. पण, एक गोष्ट लक्षात असू द्या की, इंडो- कॅरेबियन असण्याचा मला अभिमान असून, समाज ज्या गोष्टींना हाताळण्यास असमर्थ आहे अशा गोष्टींना मी घाबरत नाही. हे माझ्या ‘अनैतिक’ रक्तातच आहे”, असं मसाबाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. मसाबाने हे ट्विट पोस्ट करत ठामपणे आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सोनम कपूरने ट्विट करत तिची पाठराखण केली. ‘मसाबा, तू आमची मान गर्वाने उंचावलीस’, असं ट्विट करत तिने आपल्या मैत्रिणीला पाठिंबा दिला.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’