हॉलीवूडमध्ये ‘फॅट्रपॅक’ किंवा ‘स्लॅकरपॅक’ या संकल्पना दोन हजारच्या दशकात चित्रपटांसाठी माध्यमांनी वापरण्यास सुरुवात केली. हे सिनेमे कधीही पुरस्कारप्राप्त कलात्मक सिनेमांच्या स्पर्धेत उतरले नाहीत, तरी त्यांचे मनोरंजनमूल्य बरेच मोठे आहे. फॅट्रपॅक ही संकल्पना साठोत्तरीतल्या चंगळवादी, मुक्तछंदी पालकांच्या पोटी जन्मलेल्या आणि नव्वदीअखेर तरुणाईत गेलेल्या अमेरिकी पिढीविषयी होती. आई-वडिलांच्या कचकडय़ाच्या नातेसंबंधांमुळे सातत्याने घर आणि नाती बदलत निबर आणि बेफिकीर बनलेली विचित्र पुरुषी मानसिकता आणि तिरकस मानसिकतेचा विचार तिच्या वापरामागे होता. पालकांविषयी किंवा एकूणच कशाविषयीचीही अनास्था आणि टोकाच्या स्वार्थवादावर आधारलेल्या अनेक व्यक्तिरेखा असलेल्या विनोदी सिनेमांना मग फ्रॅटपॅक ही संकल्पना चिटकटूनच गेली. बेन स्टीलर, अ‍ॅडम सॅण्डलर, जॅक ब्लॅक, ओवेन आणि ल्यूक विल्सन, विल फॅराल या नायकांचे सारेच सिनेमे या गटात मोडू शकतील. यातल्या बहुतांश चित्रपटांत नातेसंबंधांची, कुटुंब संस्थेची यथेच्छ खिल्ली उडविलेली दिसते. नायिकेची भूमिका ही नावापुरती किंवा शून्यवत असते. पुरुषवादी आणि बऱ्यापैकी हिणकस विनोदांनी हा चित्रपट भरलेला असतो.  ‘वेडिंग कॅ्रशर’, ‘ओल्डस्कूल’, ‘हँगओव्हर’, ‘रॉयल टिननबम्स’ आणि यासारख्या कित्येक सिनेमांना यात समाविष्ट करता येईल. यातल्या कुठल्याही चित्रपटाला थोर किंवा अविस्मरणीय म्हणता येणार नाही. तरीही अल्पकाळाकरिता चर्चेत राहण्याची जबाबदारी हे सिनेमे नक्कीच पार पाडतात. आंतरराष्ट्रीय सिनेमा प्रवाहाशी एकरूप असलेल्या भारतीय चित्रपटांमध्ये ‘गोलमाल’ मालिकेपासून ते ‘धमाल’, ‘वेलकम’पर्यंत सारे या फ्रॅटपॅकचेच बांधव म्हणता येतील.

फ्रॅटपॅक संकल्पनेचा पुरेपूर वापर असलेला आणि त्या चित्रपटांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या कलाकारांना घेऊन वर्षांच्या सुरुवातीलाच ‘फादर फिगर्स’ नावाचा त्यातल्या त्यात बरा सिनेमा आला आहे. निखळ विनोदी वगैरे विशेषणांनी वर्णन करता न येण्यासारख्या या चित्रपटाचे सारे कथानकच फ्रॅटपॅक पिढीशी एकरूप झालेले आहे. म्हणजे ही गोष्ट आहे दोन जुळ्या भावांची. पीटर (हँगओव्हर फेम एड हेल्म्स) आणि काएल (ओवेन विल्सन) या मध्यमवयीन तरुणांची. चाळिशीमध्ये असलेल्या या दोघांपैकी पीटरचे लग्न आणि घटस्फोट वगैरे होऊन त्याचा तिरस्कार करणारा मुलगा त्याच्यासोबत राहतो. मनमौजी काएल अनपेक्षितरीत्या श्रीमंत बनून संसार थाटण्याच्या प्रक्रियेत असतो. भिन्न स्वभावामुळे या दोघांच्यात लहानपणापासूनच वितुष्ट असते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच चार वर्षांच्या विरामानंतर त्यांची भेट होते ते कौटुंबिक समारंभात. हा समारंभ असतो त्यांच्या साठ वर्षांच्या आईच्या कितव्याशा लग्नाचा. या लग्नसोहळ्याच्या समारंभातच आईने आपल्या वडिलांविषयी लहानपणापासून सांगितलेली सगळी माहिती खोटी असल्याचा साक्षात्कार पीटरला होतो. दोघे भिन्नविचारी भिन्नधर्मी बंधू आईविरोधात आघाडी उघडतात. आई सत्तरीच्या दशकातील आपल्या स्वच्छंद आयुष्याचा पाढा वाचते आणि एका सेलिब्रेटीचे नाव वडील म्हणून पुढे करते. नैराश्याने गांजलेला पीटर आणि अतिउत्साहाने भरलेला काएल दुसऱ्या राज्यात असलेल्या सेलिब्रेटी वडिलांना भेटायला जातात. वृद्ध झालेला सेलिब्रेटी आपल्या उतारवयात आंगतूकपणे आलेल्या जुळ्या मुलांना पाहून खूश होतो. तेथे त्यांच्या आईबद्दलच्या वास्तववादी आठवणींचा पट उलगडतानाच या सेलिब्रेटीला ही दोघे आपली मुले नसल्याची खात्री पटते. त्यांच्या चेहरेपट्टीशी साम्य असलेल्या आईच्या तत्कालीन मित्राचे नाव हा सेलिब्रेटी सांगतो. या दोन्ही भावांचा पुढील राज्यात प्रवास सुरू होतो. तेथे एका रांगडय़ा वृद्धाशी त्यांचा सामना होतो. तो त्याच्या आईविषयी आणि संभाव्य वडिलांविषयी आणखी नवी माहिती पुरवतो. प्रवास गमती, विनोद, भांडणे यांनी सुरूच राहतो. या प्रवासात चित्रविचित्र माणसांची आणि घटनांची मालिका या दोघा भावांना मनानीही एकत्र आणण्यास कारणीभूत ठरते. वडिलांच्या शोधामध्ये आणखी नवी रहस्ये आणि कोडी त्यांना सोबत करतात.

सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे विशेषणांची थोडीही जंत्री लावता न येणारा ‘फादर फिगर्स’ मनोरंजनाच्या दृष्टीने फॅट्रपॅकच्या कक्षेमध्ये जमतील तेवढय़ा गमती करतो. लॉरेन्स शेर या कित्येक चांगल्या सिनेमांचा सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळख असलेल्या कलाकाराचा हा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी तो जाणवतो. मात्र कित्येक शहरांच्या प्रवासांची सुंदर दृश्ये कसबी सिनेमॅटोग्राफीची उदाहरणेही चित्रपट दाखवितो. पुरुषवादी विनोद, लैंगिक व्यवहारचर्चा आणि कचकडय़ाचे नातेसंबंध जपणाऱ्या पिढीचा रक्ताच्या नात्यासाठीच्या पर्यटनात लागलेला स्वत:चा शोध हा चित्रपटाचा आराखडा आहे, अन् त्यात तो कधी प्रगल्भ तर कधी बाळबोध वाटा पत्करून अवखळ मनोरंजन करतो. अलीकडच्या विनोदी हिंदी सिनेमांमुळे या प्रकारच्या अवखळ मनोरंजनाची भरपूर सवय झालेल्या आपल्याकडच्या प्रेक्षकांनाही तो सहज आवडून जाईल.