News Flash

BLOG : ज’बाप’दारी

जर प्रकाश देणारा पांढरा रंग म्हणजे आई असेल तर सावलीचा काळा रंग म्हणजे बाप असतो

BLOG : ज’बाप’दारी

– कलादिग्दर्शक सुमीत पाटील

माझे वडील म्हणजे पोलिस निरीक्षक, संजय जगन्नाथ पाटील. तसे तर बाबा पोलिसात असल्याने घरात सुख:-दु:खाचा कोणताही प्रसंग असो, बाबा घरात नसण्याची एकप्रकारे सवयच झाली होती. पण करोना काळात गोष्ट वेगळी होती. लहान असताना बाबा सतत बाहेर ड्युटीवर असायचे त्यामुळे आईशीच सगळे बोलणे होत असे. बाबांचा एक धाकही होता. त्यामुळे बाबा यायच्या आधी अभ्यासाला मुद्दाम बसणे असेल किंवा रात्री जेवण्यासाठी त्यांची वाट बघणे असेल. नेहमी बाबा बाहेर आणि आम्ही घरात बसून त्यांची वाट पाहायचो. पण आता मोठे होत गेल्यावर परिस्थिती बदलली आहे. आता मी कामानिमित्त सतत घराबाहेर असतो. कलाविश्वातील कामामुळे मला जास्त वेळ घराबाहेर रहावं लागतं त्यामुळे, सध्या बाबा माझी वाट पाहत असतात. अर्थात हे कधी जाणवलेच नाही. रात्री खूप उशीर झाला तर बाबा फोन करायचे, ‘येतोयस ना सुमीत घरी, का कामाच्या ठिकाणीच मुक्काम आहे ?’ त्यांच्या त्या १५ सेकंदांच्या फोनमधून त्यांना वाटणारी काळजी आता ख-या अर्थाने समजते आहे.

करोना काळात नेमका मी अडकलो आहे, कुडाळला. एका प्रकल्पाच्या कामासाठी इथे आलो होतो आणि टाळेबंदी झाल्यामुळे आता इथेच अडकलो. सध्या मी जिथे राहतो, ती माणसे अतिशय प्रेमळ आहेत. त्यांनी कधीही मला परकेपणाची जाणीव करुन दिली नाही. हे घरं माझंच आहे असंच सतत घरात वातावरण ठेवलं. विशेष काळजी घेतली, प्रेम दिले. तरीही आपल्या घराची आठवण असतेच. त्यामुळे आता इतके दिवस घरापासून दूर राहताना नकळत उशीरा येणा-या बाबांची, घरी जाण्यासाठी वाट पाहणा-या त्या पोलिस कर्मचा-यामधील भावनेची किंमत आता कळते आहे.

करोना काळात टाळेबंदी झाल्यावरही सगळे घरात बसले पण माझे बाबा कर्तव्यावर जातच होते. त्यांना काही पर्यायच नव्हता. घरी फक्त आई आणि भाऊ. मी मुंबईपासून लांब कुडाळला. अशावेळी रोज त्यांच्याशी बोलणं हाच काय तो दुवा होता. व्हिडीओ कॉल जरी होता, तरीही बरेचदा बाबांना फोन नीट धरायला जमत नसल्यामुळे खरोखरच त्यांना नीटपणे बघताही येत नव्हते. अशावेळी माझ्या मनातली काळजी आणखी वाढत असे. कुडाळला निसर्गाने भरभरून देणं दिलं आहे, त्यामुळे माझ्यातला कलाकार ती नवनिर्मिती पाहून सुखावत होता पण तरीही घरची आठवण शांत बसू देत नव्हती. इतक्याच एप्रिलमध्ये एक नकोशी बातमी आली, माझ्या आईलापण करोना झाला होता. आता मात्र मी पुरता हादरलो. आईचे उपचार, सुरुवातीला तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी केली जाणारी धावपळ या सगळ्यात बाबा अत्यंत दमून जात होते. तरीही प्रेमाने आणि काळजीने ते सारं काही करत होते. फारसे टेकसॅव्ही नसल्याने मोबाइलवरून वस्तू मागवणे, टॅक्सी मागवणे वगैरे गोष्टी त्यांना जमत नव्हत्या. पण त्यांनी तक्रार केली नाही. नेहमी अशी काही परिस्थिती उद्भवली की बाबा फोनवरून आम्हाला सांगत, अमुक करा, तमुक करा. कारण ते स्वत: ड्युटीवर असत. यावेळी मात्र उलटे होते. मी फोनवरून बाबांना हजार सूचना करत होतो. माझ्या ओळखी-पाळखी वापरत होतो. त्यावेळी खरोखरच बाबांच्या मनस्थितीची कल्पना आली. कुटुंबाला गरज असताना आपण लांब असण्यातली मजबूरी काय असते, हे मी यावेळी अनुभवले.

शेवटी आईला घरीच ठेवायचे आणि काळजी घ्यायची हे नक्की झाले. आमच्या सर्व शेजा-यांनी अतिशय सहकार्य केले. त्यामुळे आई करोनाच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर पडली. पण या काळात बाबांना मात्र खरोखरच आधाराची गरज भासली असेल कारण त्यांच्या संसाराचा आधारस्तंभ असलेली आमची आईच आजारी पडली म्हटल्यावर बाबाही हडबडून गेले. अनेकदा ते फोनवर मला सांगायचे, मी तुला सांगतोय हे पण तू आईला सांगू नकोस तिला त्रास होईल. बाबांचे हे रुप मला नव्यानेच दिसणारे होते. माझ्या रंगरेषांच्या भाषेत बोलायचे झाले तर आजवर बाबांमधला फक्त एक करारी रंग पाहिला होता पण या काळात त्यांच्यातला प्रेमळ, हळवा बाप, जबाबदार कर्मचारी, अशा अनेक रंगछटा पाहिल्या. आणि हे इंद्रधनुष्य पाहणे खूप सुखावणारे होते. जर प्रकाश देणारा पांढरा रंग म्हणजे आई असेल तर सावलीचा काळा रंग म्हणजे बाप असतो, हे माझेच वाक्य मला अधिक पटू लागले.

करोना संकटाच्या काळात अनेक वेळा पोलिसांवर टीका झाली, त्यांच्यावर काही वाईट जोक किंवा मीम्स तयार केले गेले. समाज माध्यमांमधील या गोष्टी पाहून मला मनातल्या मनात फार वाईट वाटायचे, पण हळूहळू परिस्थिती बदलली. पोलिसांच्या कामाचे महत्त्व आता सगळ्यांनाच खरोखर जाणवू लागले आहे. ते पाहून मलाही बरे वाटले, जणू कोणीतरी माझ्या बाबांचेच कौतुक करते आहे,असे वाटत असे.

या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपल्या रोजच्या धावपळीत कुटुंबाला वेळ द्यायला आपण सगळेच विसरुन जातो ते बदलले पाहिजे. गेल्या ३० वर्षांच्या आयुष्यात असे वाटले की, बाबांशी इतका काळ, इतक्यांदा पहिल्यांदाच बोललो असेन. या करोनाने आपल्याला खूप काही शिकवले आहे, त्यातला महत्त्वाचा धडा आहे, आपली माणसे, आपले शरीर ओळखण्याची. त्याची काळजी करण्याची. मी तरी हा धडा शिकलो आहे, त्यामुळे यंदाचा फादर्स डे माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या घरातल्या बापमाणसामुळे मी ख-या अर्थाने जबाबदारी नव्हे तर ज’बाप’दारी शिकलो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 12:30 pm

Web Title: fathers day special blog on police ssj 93
Next Stories
1 सारामुळे अस्वस्थ होता सुशांत; ‘केदारनाथ’च्या दिग्दर्शकाचा खुलासा
2 अक्षयला फोटोशूट करताना वॉचमनने दिलं होतं हाकलून; त्याच ठिकाणी घेतलं स्वत:चं घर
3 Father’s Day 2020 : या पाच चित्रपटांशिवाय ‘फादर्स डे’ आहे अपूर्ण
Just Now!
X