आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत प्रदर्शित होणारा या वर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट ठरणार आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील आणखी एका भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. ही भूमिका आहे ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखची.

जाफिरा असं फातिमाच्या भूमिकेचं नाव असून एका धाडसी योद्धाच्या पोशाखात ती पाहायला मिळत आहे. ‘इसके निशाने से बचके रहो’ असं कॅप्शन आमिरने या मोशन पोस्टरला दिलं आहे. या मेगा-अॅक्शन चित्रपटातील भूमिका एकेक करून प्रेक्षकांसमोर आणल्या जात आहेत. याआधी बिग बींचा लूक प्रदर्शित झाला होता.

वाचा : ..म्हणून आमिरने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले

उत्साही आणि तेजस्वी अशी जाफिरा तिरंदाजीत तरबेज आहे. रोमांच आणि अॅक्शनने परिपूर्ण अशा या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे. बिग बी, फातिमानंतर आता आमिर खान आणि कतरिना कैफ यांचा लूक पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.