अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे. मात्र त्याचबरोबर या चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मनासारखी स्टारकास्ट मात्र मिळत नाही अशाही चर्चा आहेत. याआधी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असेल अशा चर्चा होत्या मात्र आमिरनं नकार दिल्यानंतर या चित्रपटासाठी शाहरूखच्या नावाची निवड करण्यात आली. शाहरुखचं नाव जवळपास निश्चित असताना आता चित्रपटाची गाडी मुख्य अभिनेत्रींकडे येऊन अडली आहे.

प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकरनंतर फातिमा सना शेखला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं आहे. ‘दंगल’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’सारख्या चित्रपटात फातिमानं काम केलं आहे. फातिमाबरोबरच आणखीही अभिनेत्रींच्या नावाचा विचार केला जात आहे. आमिरनं तारखा उपलब्ध नसल्यानं या चित्रपटासाठी नकार दिला होता. आमिरच्या नकारामुळे भारताचा सुवर्णक्षण आणि राकेश शर्मा यांची कामगिरी रुपेरी पडद्यावर उमटवण्याची संधी शाहरूखच्या पदरात आली. या चित्रपटाचं नाव ‘सारे जहाँ से अच्छा’ असण्याची शक्यता आहे. ‘आरकेएफ प्रोडक्शन’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. २०१९ मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.