बॉलीवूडच्या स्पध्रेत उतरलेल्या पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची गाडी इथे वेगाने धावते आहे. ‘खुबसूरत’ चित्रपटानंतर ‘कपूर अँड सन्स’ या त्याच्या दुसऱ्या चित्रपटातील भूमिकेलाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे. तो लागोपाठ तिसऱ्या बॉलीवूडपटात काम करतो आहे. भूमिकेबाबत चोखंदळ असणारा फवादने त्याच्या आगामी पाकिस्तानी चित्रपटात ६१ वर्षीय संगीतकाराची भूमिका केली आहे.
सध्या करण जोहर दिग्दíशत ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटात फवाद खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटानंतर तो लगेचच मायदेशी रवाना होणार आहे. सातत्याने तीन बॉलीवूडपटांमध्ये अडकलेला फवाद एका गॅपनंतर पाकिस्तानी चित्रपटात काम करतो आहे. पाकिस्तानी संगीतकार आलमगीर यांच्यावर आधारित हा चित्रपट असून फवाद यात ६१ वर्षीय आलमगीर यांची भूमिका करणार आहे. उर्दू पॉप गायक – संगीतकार आलमगीर हे पाकिस्तानमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. मूळचे पाकिस्तानमधील आलमगीर आता बांगलादेशमध्ये स्थायिक आहेत. राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या घरात जन्मलेल्या आलमगीर यांचा संगीतकार म्हणून झालेला प्रवास अत्यंत वेगळा असा आहे. काही वर्षे अमेरिकेत राहून मग पॉप गायक म्हणून ठसा उमटवणाऱ्या आलमगीर यांच्या कारकीर्दीचा वेध ‘अलबेला राही’ या चित्रपटातून घेण्यात येणार आहे.
आलमगीर यांच्या भूमिकेत म्हणजे पर्यायाने पॉप गायक – संगीतकाराची भूमिका साकारणारा फवाद हिंदीतही डीजेच्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्कील’मध्ये फवाद खान डीजेच्या भूमिकेत आहे. आपल्याला मिळणारे चित्रपट आणि भूमिका याबद्दल फवाद समाधानी आहे.
मात्र यशाच्या शिखरावर असताना ६१ वर्षीय संगीतकाराची भूमिका करण्याचा धोका भले भले पत्करत नाहीत. फवाद त्याला अपवाद ठरला आहे. त्याने याआधी केलेल्या दोन्ही हिंदी चित्रपटांतील भूमिका वेगळ्या होत्या. बॉलीवूडमधील आपल्या वाटचालीबद्दलही आपण समाधानी असल्याचे फवादचे म्हणणे आहे.