वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हिंदीचे पर्व १३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमी प्रमाणे शो सुरु होण्यापूर्वीच चर्चेत आहे. शोच्या प्रत्येक पर्वामध्ये नवीन गोष्टी पाहायला मिळतात. आता बिग बॉस १३ मध्ये देखील नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस १३मध्ये स्पर्धकांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी दोन बिग बॉस असणार आहेत. त्यामधील एक महिला बिग बॉस असण्याची शक्यता आहे. आता पर्यंतच्या पर्वांमध्ये पुरुष बिग बॉसचा आवाज ऐकायला मिळाला होता. या पर्वामध्ये थोडा बदल करत महिला बिग बॉसचा आवाज असण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
बिग बॉस पर्व १३ मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. मुग्धा गोडसे, चंकी पांडे, सिद्धार्थ शुक्ला, आदित्य नारायण, मिहिका शर्मा, राजपाल यादव आणि ऋचा भद्रा हे स्पर्धक सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार असून शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बिग बॉस १३चा सेट लोणावळामध्ये न उभारता गोरेगाव येथे फिल्मसिटीमध्ये उभारण्यात येणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे.
‘बिग बॉस १२’ च्या पर्वामध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. हे पर्व विशेष गाजलेही होते. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वाची थीम कोणती असावी याविषयी शो मेकर्समध्ये प्रचंड चर्चा रंगली. या चर्चेअंती यंदाची थीम हॉरर असावी असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ‘बिग बॉस १३’च्या यंदाच्या पर्वामध्ये हॉरर ही थीम पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2019 1:51 pm