देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन खबरदारीचे अधिकाधिक उपाय करताना दिसत आहे. प्रशासनाच्या कामाला साथ देत चित्रपट आणि टिव्ही क्षेत्रानेही खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या आणि कलाकारांच्या करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

टेलिव्हिजन आणि चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने (Indian Film and TV Producers Council- IFPTC) या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. यात उल्लेख केल्याप्रमाणे, गेल्या ४ दिवसांत, ९० हून अधिक कार्यक्रमांच्या टीममधल्या सर्व सदस्यांच्या आऱ़टीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत ९००० हून अधिक करोना चाचण्या झाल्या असून त्यांचे अहवाल प्रशासनाकडे पाठवल्याची माहिती मिळत आहे. शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेच्या नियमानुसार १५ दिवसांनी या चाचण्या पुन्हा करण्यात येणार असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. तसंच खबरदारी म्हणून दर आठवड्याला अँटिजेन चाचण्या करण्याचंही या संघटनेने सुचवलं आहे.

आणखी वाचाः गर्दीचे सीन, गाण्यांच्या चित्रीकरणावर निर्बंध; ‘हे’ असतील चित्रपटसृष्टीसाठीचे नवे नियम

टीव्ही आणि वेब विभागाचे अध्यक्ष जे डी मजेठिया यांनी सांगितलं की, सर्व प्रकारची चित्रीकरणे खबरदारी घेऊन केली जात आहेत. सेटवर बायोबबलचाही वापर सुरु झाला आहे. त्याच्या वापरासंबंधी निर्मात्यांना वारंवार सूचना केल्या जात आहेत. या क्षेत्राने जे प्रतिबंधक उपाय केले आहेत ते विचारात घेता प्रशासन या क्षेत्रावर लॉकडाऊन लावणार नाही अशी आशा मजेठिया यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर हे क्षेत्र लोकांचं मनोरंजन करून त्यांना घरी बसण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या क्षेत्राला अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला जाईल आणि या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून ग्राह्य धरलं जाईल अशी आशा मजेठिया यांनी यावेळी व्यक्त केली.