चित्रनगरीतील कामगारांचा नऊ दिवसांपासून संप; चित्रपट कलाकारांबरोबर प्रशासनाचेही दुर्लक्ष

रोजच्या जगण्यातून सर्वसामान्यांना विरंगुळा देत स्वप्नांच्या दुनियेची सफर घडवून आणणाऱ्या चित्रपट आणि मालिका सृष्टीतील पडद्यामागील कामगार आणि तंत्रज्ञ मात्र हलाखीचे व दुर्लक्षित जिणे जगत आहेत. कामाचा अत्यल्प मोबदला, दिवसातून १६ ते १८ तास चालणारे चित्रीकरण, कामाच्या ठिकाणचा ताण, अपुऱ्या प्राथमिक सुविधा अशा विविध समस्यांनी ग्रासलेले चित्रनगरीतील हजारो कामगार गेल्या नऊ दिवसांपासून संपावर गेले आहेत. परंतु, रुपेरी पडद्यावरील झगमगाटामध्ये या कामगारांकडे आतापर्यंत कुणाचेही लक्ष गेलेले नाही.

चित्रीकरणाच्या ठिकाणी पूर्वी सर्व कामगारांची आठ तासांची कामाची पाळी असे. परंतु मालिका ‘डेली सोप’ झाल्याने त्यांचे चित्रीकरण वाढले. त्याचा दुष्परिणाम कलाकारांसोबतच तंत्रज्ञ व कामगारांना सहन करावा लागत आहे. ‘मालिकांचे चित्रीकरण सलग १६ ते १८ तास चालत असल्याने आम्हालाही तितके तास काम लागते. पूर्वी मुंबईबाहेर दहिसरच्या पुढे चित्रीकरणाला गेल्यास दीड दिवस कामाची पाळी लावली जायची. मात्र मालिकांच्या चित्रीकरणामुळे दीड दिवसाच्या पाळीतील काम बंद झाले. आता नायगाव, वसईत मालिकांचे चित्रीकरण असले तरी दीड दिवसाची पाळी गृहीत धरली जात नाही,’ असे सिनेतंत्रज्ञ रवि राज यांनी सांगितले.

नियमानुसार जेवणाकरिता चार ते पाच तासांनी ब्रेक घेतला जातो. मात्र मालिकांच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांच्या कामाच्या वेळा, मूड यानुसार ब्रेक दिला जातो. जर एखाद्या कलाकाराला लवकर स्टुडिओतून बाहेर जायचे असेल तर त्याच्याकरिता दिग्दर्शक चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागे लागतो. त्यात आम्हाला जेवण करण्याइतपतही उसंत मिळत नाही. अशा वेळेस चित्रीकरण संपल्यानंतरच अवेळी जेवण करावे लागते, अशी तक्रार सिनेतंत्रज्ञ संदीप देवरे यांनी केली.कामाची पाळी दुपारी दोन ते रात्री दोन असल्यास चित्रीकरण संपल्यानंतर रात्री-अपरात्री रेल्वे स्थानकावरच पहाटे सुरू होणाऱ्या रेल्वेची वाट पाहत वेळ घालवावा लागतो. त्यात दुसरी पाळी सकाळचीच असेल तर पुरेशी झोपही न घेता पुन्हा चित्रीकरणाचे ठिकाण गाठावे लागते. रात्रीच्या पाळीकरिता मिळणारे १०० ते २०० रुपयांचे प्रवासभाडेही अपुरे असल्याची तक्रार तंत्रज्ञ प्रेम ठाकूर यांनी केली. काही ठिकाणी कमी मोबदला देऊन बाहेरून कामगार आणले जातात, त्यामुळे चित्रनगरीतील नियमित कामगारांना काम मिळत नसल्याची खंत स्पॉटबॉय गणेश नाईक यांनी व्यक्त केली. स्पॉटबॉईज, ज्युनियर आर्टिस्ट आणि वेगवेगळ्या मालिका चित्रपट यांच्या सेटवरचे कामगार, निर्मिती संस्थांचे कर्मचारी असे अडीच लाख कर्मचारी यांच्यासह सिने कामगारांच्या २२ संघटना फेडरेशन ऑफ वेस्टर्न युनियनच्या नेतृत्वाखाली संपात सहभागी झाल्या आहेत. विविध संघटनांचे १६ पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले आहेत.

स्वच्छतेचा अभाव

चित्रीकरणाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता आणि शौचालयचा अभाव असतो. चित्रनगरीत ५० चित्रीकरणाचे सेट असून एका सेटवर एक किंवा दोन शौचालय असतात. मात्र एका चित्रीकरणावेळी १०० ते १५० जण काम करत असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता व स्वच्छतेचा अभाव नेहमीच जाणवतो. अनेक दिग्गज कलाकार पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानासोबत जोडले गेले आहेत. मात्र ज्या जागेशी त्यांचा चित्रीकरणाच्या निमित्ताने संबंध येतो, तिथे स्वच्छतेचा अभाव आहे, अशा शब्दांत बिरेंद्रनाथ तिवारी यांनी विरोधाभास दाखविला.

स्वच्छतेचा अभाव

चित्रीकरणाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता आणि शौचालयचा अभाव असतो. चित्रनगरीत ५० चित्रीकरणाचे सेट असून एका सेटवर एक किंवा दोन शौचालय असतात. मात्र एका चित्रीकरणावेळी १०० ते १५० जण काम करत असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता व स्वच्छतेचा अभाव नेहमीच जाणवतो. अनेक दिग्गज कलाकार पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानासोबत जोडले गेले आहेत. मात्र ज्या जागेशी त्यांचा चित्रीकरणाच्या निमित्ताने संबंध येतो, तिथे स्वच्छतेचा अभाव आहे, अशा शब्दांत बिरेंद्रनाथ तिवारी यांनी विरोधाभास दाखविला.

अपुरा मोबदला

आठ तास कामाचे असताना १६ ते १८ तास राबवून स्पॉटबॉयला महिना १५ ते २० हजार तर कॅमेरामनला २० ते २५ हजार मोबदला मिळतो, तर तंत्रज्ञाला ३० हजारापर्यंत पगार मिळतो. हे पैसे कामाच्या तासांशी मेळ घालणारे नाहीत.

बससेवा बंद

संप सुरू झाल्यानंतर फिल्मसिटीपर्यंत सुरू असलेली बससेवाही बंद करण्यात आली. चित्रपटनगरीबाहेरच संतोष नगपर्यंत बससेवा सुरू आहे. जोपर्यंत संप मिटत नाही तोपर्यंत बससेवा सुरू होणार नसल्याचे कळते.