सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तस्लानिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. आयुष्य स्वच्छंदीपणे जगणाऱ्या या चारजणींभोवती चित्रपटाचं कथानक फिरत असून, ते हल्लीच्या पिढीला आपलंसं वाटत असल्याचीच प्रतिक्रिया ट्रेलर पाहून अनेकांनी दिली. मुख्य म्हणजे ट्रेलरमध्ये काही अपशब्द आणि उथळ भाषेचाही वापर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

‘वीरे दी वेडिंग’च्या ट्रेलरमधील भाषा पाहता आता या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ प्रमाणपत्र देऊन प्रमाणित केल्याचं म्हटलं जात आहे. निर्मात्यांनी या चित्रपटातील शिवीगाळ किंवा एकंदर वापरण्यात आलेल्या भाषेवर कोणत्याही प्रकारची कात्री न चालवण्याची विनंती सेन्सॉरकडे केली होती. ज्यानंतर या चित्रपटावर कात्री न चालवता कोणत्याही कटशिवाय त्याला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्यामुळे ‘वीरे…’ पुढे सेन्सॉर नमलं असं म्हणायला हरकत नाही.

चित्रपटाची वाट आता मोकळी झाली असून, सेन्सॉरकडूनही ‘वीरे…’ला प्रमाणित करण्यात आलं आहे, याविषयीच निर्माती रिया कपूर हिला एका कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सेन्सॉरच्या भूमिकेविषयी आपलं मत मांडत रिया म्हणाली, ‘आतापर्यंत तरी सेन्सॉरकडून कोणतीच अडचण निर्माण करण्यात आलेली नाही. याविषयी मी फार काही बोलू इच्छित नाही कारण अद्यापही आमच्या हाती अधिकृत प्रमाणपत्र आलेलं नाही. त्यामुळे प्रमाणपत्र मिळताच याविषयीची अधिकृत माहिती देण्यात येईल.’

वाचा : IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट

शशांक घोष दिग्दर्शित हा चित्रपट सध्या प्रेक्षकामध्ये चांगदलीच उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. १ जूनपासून ‘वीरे दी वेडिंग’साठी घालण्यात आलेला हा सर्व घाट प्रेक्षकांना पाहता येणार असून, या चित्रपटरुपी अफलातून सोहळ्यात सहभागी होता येणार आहे.