प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शारदा प्रसन्ना नायक यांचा करोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. ते ९३ वर्षांचे होते. भुवनेश्वर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शारदा प्रसन्ना ओडिया सिनेसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक होते. ‘भक्ता जयदेव’, ‘लक्ष्मी’, ‘स्री’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. ‘लक्ष्मी’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला ४३ लाखांचा टप्पा

देशात करोना संसर्गाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे.

देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ करोनाबाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ३३ लाख ९८ हजार ८४५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ७३ हजार ८९० जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५,१८,०४,६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील ११ लाख ५४ हजार ५४९ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आले आहे.