04 March 2021

News Flash

मायाबाजार थंडच!

शंभर-दोनशे कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांसाठी बॉलीवूडची भिस्त अजूनही आमिर, शाहरूख आणि सलमान या तीन खानांवर आहे.

| June 7, 2015 01:37 am

शंभर-दोनशे कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांसाठी बॉलीवूडची भिस्त अजूनही आमिर, शाहरूख आणि सलमान या तीन खानांवर आहे. गेल्या दीड वर्षांत या तीनही खानांनी हिट चित्रपट दिले असले तरी तुलनेने इतर चित्रपटांना तेवढी कमाई न करता आल्याने बॉलीवूडच्या उत्पन्नाच्या आकडय़ात एका टक्क्यानेही वाढ झालेली नाही. २०१२ मध्ये हिंदूी चित्रपटसृष्टीच्या सरासरी उत्पन्नाने ११२.४ अब्ज रुपये एवढी झेप घेतली होती. २०१३ मध्ये हाच आकडा १२५.३ अब्ज रुपये एवढा वाढला, मात्र त्यानंतर बिग बजेट चित्रपटांना आलेले अपयश, तुलनेने छोटय़ा चित्रपटांनी ५० कोटींच्या वर केलेला व्यवसायही बॉलीवूडचा हा आकडा वाढवू शकला नसल्याने एकूणच चित्रपट उद्योगात चिंतेचे वातावरण आहे.
२०१२ आणि २०१३ मध्ये बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांनी १०० ते २०० कोटींच्या आसपास कमाई केल्याने एकूणच उत्पन्नाचा आकडा झपाझप वाढला. २०१३ मध्ये १२५.३ अब्ज रुपये एवढे उत्पन्न होते, मात्र २०१४ मध्ये तीन खानांनी केलेल्या तीन चित्रपटांची कमाई सोडली तर अन्य चित्रपटांना १०० कोटींच्या आतच व्यवसाय करता आला. त्यामुळे गेल्या दीड वर्षांत या उद्योगाचे उत्पन्न जेमतेम १२६.४ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
२७ पैकी फक्त पाच हिट
गेल्या सहा महिन्यांत एकूण २७ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात ‘तनू वेड्स मनू रिटर्न्‍स’या एकमेव चित्रपटाने १०० कोटींच्या वर कमाई केली आहे. फक्त पाचच चित्रपट ‘हिट’ ठरले असून त्यात ‘पिकू’, अक्षय कुमारचा ‘बेबी’ आणि ‘गब्बर इज बॅक’ या तीनच चित्रपटांनी ७० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’ हा यावर्षी तिकीटबारीवर सर्वात जास्त अपयशी ठरलेला चित्रपट आहे. ११६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला ३० कोटींपर्यंतही पोहोचता न आल्याने ‘फॉक्स स्टार’सारख्या बडय़ा निर्मात्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.
अनुराग कश्यपचा ‘बॉम्बे वेल्वेट’, दिबाकर बॅनर्जीचा ‘ब्योमकेश बक्षी’, ‘तेवर’, ‘डॉली की डोली’, ‘षमिताभ’, ‘रॉय’ असे अनेक चित्रपट तिकीटबारीवर सपशेल अपयशी ठरले आहेत. यावर्षी एकूणच व्यवसाय चांगला झालेला नाही. त्यामुळे काही बोलण्यासारखे उरलेले नाही, असा पवित्रा ‘फॉक्स स्टार’च्या सूत्रांनी घेतला आहे. ‘फिक्की’च्या अहवालाप्रमाणे बॉलीवूडच्या उत्पन्नात शून्य टक्के वाढ झाली आहे. त्यातच, ‘बॉम्बे वेल्वेट’सारख्या चित्रपटाचे अपयश मोठे असल्याने ‘धर्मा प्रॉडक्शन’सारख्या यशस्वी बॅनरबरोबर सहनिर्मितीचा वेगळा प्रयोग करत असल्याचे ‘स्टार इंडिया’च्या उदय शंकर यांनी सांगितले.

प्रेक्षकांची मानसिकता खूप बदलली आहे. तुमच्या चित्रपटात लोकांच्या काळजाला भिडणारे कथानक नसेल तर कितीही मार्केटिंग केले तरी यश मिळत नाही. बॉलीवूडच्या तीनही खानांचे चित्रपट त्यांच्या चाहत्यांच्या जिवावर चालतात, मात्र हे यशाचे परिमाण असू शकत नाही.
– महेश भट्ट, दिग्दर्शक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 1:37 am

Web Title: film industry fights with low revenues
Next Stories
1 ये नच नहीं आसान..
2 गश्मीर ‘रेडी टू रॉक’
3 संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्रचा”चंदू शिकारी”!!
Just Now!
X