जुने चित्रपट कृष्णधवल चित्रफितीद्वारे दाखविले जात. तरीदेखील त्यातील बारकावे प्रेक्षकांच्या मनाला सहजगत्या भिडायचे. चित्रीकरणासाठी प्रगतशील साधनांचा अभाव असतानाही निर्मिलेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. सध्या आधुनिक तंत्रज्ञान, कॅमेऱ्यांचे विविध प्रकार, लेन्सद्वारे चित्रीत केलेले चित्रपट मनाला भिडत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी व्यक्त केली.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागातर्फे ‘सिनेमा अ कॅलिडोस्कोपिक व्ह्य़ू’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादात डॉ. पटेल बोलत होते. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक-मोने, प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजीत जोशी या वेळी उपस्थित होते. मराठा रीसर्च जर्नलच्या ‘सिनेमा अ कॅलिडोस्कोपिक व्ह्य़ू’ या शोधनिबंधाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

पटेल म्हणाले, समाजात बदल घडविण्याची ताकद असलेला स्रोत म्हणून चित्रपट माध्यमाकडे पाहिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चित्रीकरणाची साधने सहजतेने वापरणे शक्य असले तरी, पूर्वीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. चित्रपटासाठी दिग्दर्शकाला संपूर्ण तांत्रिक गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कमीत कमी संवाद, संगीत आणि मुद्राभिनयाद्वारे  प्रेक्षकांना चटकन उमगते.

आगाशे म्हणाले, माध्यमांमध्ये टिकण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. चित्रपटातील एखाद्या व्यक्तिरेखा साकारताना अतिशयोक्तपणाऐवजी नैसर्गिक अभिनयाची कास धरली पाहिजे.