आपल्या मोहक अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री मधुबाला यांच्यावरील चरित्रपटाचा घाट घातला जात होता. आणि हा चरित्रपट दुसरं-तिसरं कोणी नव्हे तर प्रेमकथा सांगण्यात हातखंडा असलेला दिग्दर्शक इम्तियाज अली करणार होता. मात्र आता या दोन्ही सुवर्णसंधी हुकलेल्या आहेत. इम्तियाजचा ‘लव्ह आज कल २’ हा चित्रपट गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झाला, खरंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच इम्तियाज मधुबालावरच्या चरित्रपटाची घोषणा करणार होता. मात्र या चित्रपटासाठी मधुबाला यांच्या कुटुंबीयांकडून काही परवानगी मिळणे आवश्यक होते. ती मिळत नसल्याने अखेर इम्तियाजने या चित्रपटासंबंधीचा करार रद्द केल्याचे सांगितले जाते. मधुबाला यांची बहीण मधुर ब्रिज भूषण या सगळ्या कुटुंबीयांकडून या चरित्रपटासंबंधी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी पाठपुरावा करत होत्या. आपल्याला सगळ्या भावंडांनी नक्कीच सहकार्य केले असते. सगळ्यांकडून कागदोपत्री परवानगी मिळाल्यानंतरच इम्तियाज चित्रपटाचे काम सुरू करणार होता. या चित्रपटात मधुबाला यांच्या नातेवाईकांची एकही गोष्ट येणार नाही, असे आश्वासनही निर्माता-दिग्दर्शकांकडून देण्यात आले होते. मात्र एवढे होऊनही मधुबाला यांची एक बहीण कनीज बलसारा यांच्याकडून चित्रपटाला विरोध करण्यात आल्याची माहिती मधुरा यांनी दिली आहे. त्यांनी विरोध तर केलाच, उलट निर्मात्यांनाच कायदेशीर नोटीस पाठवल्याने या चित्रपटाच्या मार्गात अडथळे येणार हे दिग्दर्शक इम्तियाजच्या लक्षात आले. अखेर त्याने या चित्रपटाचा करारच रद्दबातल केला असल्याचे सांगितले जाते. मात्र इम्तियाजच्या या निर्णयाने आणि आपल्याच कु टुंबीयांमुळे मधुबाला यांच्यावरचा चरित्रपट रुपेरी पडद्यावर जिवंत होण्याची सुवर्णसंधी आपण गमावून बसलो आहोत, अशी भावना मधुरा यांनी व्यक्त केली आहे. मधुरा आणि त्यांचे गुरू अरविंद मालवीय हे या चित्रपटनिर्मितीसाठी पाठपुरावा करत होते. या चित्रपटातून जे उत्पन्न मिळेल त्यातून गरीब मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा या दोघांचा मानस होता, मात्र आता हा चरित्रपटच प्रत्यक्षात येणार नाही आहे. इम्तियाज आणि मधुबाला हे वेगळे समीकरण या चरित्रपटाच्या निमित्ताने जुळून आले असते, मात्र प्रेक्षक त्यालाही मुकले आहेत.

‘माझी वाट पाहा’

इरफान खानच्या आजारामुळे तो कित्येक दिवस रुपेरी पडद्यापासून आणि चाहत्यांपासून दूर राहिला आहे. यशाच्या शिखरावर असताना त्याला आजाराने ग्रासले आणि त्याच्या चित्रपटांच्या वेगालाही खीळ बसली. मात्र आता आपण परत येत असल्याची आनंदवार्ता इरफानने एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. यानिमित्ताने इरफानने व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफानच्या ‘हिंदी मीडियम’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल आहे आणि यात त्याच्याबरोबर करिना कपूर खानची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट आपल्यासाठी खूप खास असल्याचे इरफानने म्हटले आहे. ज्या प्रेमाने आणि उत्साहाने आम्ही हा चित्रपट केला त्याच उत्साहात या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याची माझी इच्छा आहे. पण अजूनही माझ्या शरीरात काही पाहुणे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याबरोबर वाटाघाटी कराव्या लागतील, बघूया गोष्टी कशा पद्धतीने पुढे जात आहेत, मात्र जे काही घडेल त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल, असे इरफानने यात म्हटले आहे. इरफान रुपेरी पडद्यावर परतला असला तरी तो या आजारातून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो या चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी करू शकणार नाही, असे सांगितले जाते. आयुष्यात संकटं येतात तेव्हा सकारात्मकरीत्या विचार करत त्यातून बाहेर पडण्याशिवाय तुमच्याक डे दुसरा पर्याय नसतो, असे सांगत याच सकारात्मक विचारातून ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपट करण्यात आला आहे, असे त्याने स्पष्ट केले. हा चित्रपट तुम्हाला शिकवेल, हसवेल, रडवेल आणि पुन्हा एकदा हसवेल असे म्हणत त्याने या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. इतकंच नाही तर हा संवाद थांबवताना आणि माझी वाट पाहा.. असा संदेश देण्यासही तो विसरलेला नाही.