शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘बाळकडू’ची चित्रपट निर्माती स्वप्ना पाटकर हिला पोलिसांनी अटक केली आहे. एका रूग्णालयात नोकरी मिळवण्यासाठी तिने बोगस पीएचडी पदवी मिळवली होती. क्लिनिकल फिजिओलॉजी या विषयात तिने मिळवलेली पीएचडीची पदवी ही बोगस असल्याचं सिद्ध झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी तिला अटक केली आहे.

सामाजिक कार्यकर्ता गुरदीप कौर सिंग यांच्याकडे आलेल्या एका निनावी लिफाफ्यात चित्रपट निर्माती स्वप्ना पाटकरच्या बोगस पदवीसंबंधीत काही कागदपत्र अढळून आले होते. त्यानुसार त्यांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तिला आज अटक केली आहे. लिफाफ्यात आढळलेल्या कागदपत्रानुसार, स्वप्ना पाटकर हिने २००९ मध्ये कानपूर इथल्या छत्रपती शाहूजी महाराज विश्वविद्यालयातून पीएचडी मिळवल्याचे बनावट प्रमाणपत्र बनवून घेतले होते. हे बनावट प्रमाणपत्र तिने लीलावती हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये ऑनररी कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी वापरले होते. यानुसार तिला नोकरी देखील मिळाली. स्वतःला डॉक्टर असल्याचं भासवत मानसिक आजाराने ग्रस्त रूग्णांची ती फसवणूक करत होती.

तिचे पीएचडी पदवी प्रमाणपत्र बोगस असल्याचं सिद्ध झाल्यानंतर तिला आज अटक करण्यात आली. उद्या स्वप्ना पाटकर हिला रिमांडसाठी कोर्टात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली आहे.