लहान मुलांसाठी चित्रपट तयार करणे ही ‘सीएफएसआय’ (चिल्ड्रन फिल्म सोसायटी, इंडिया)ची मुख्य जबाबदारी आहे. मात्र उन्हाळी सुट्टय़ांच्या निमित्ताने लहान मुलांसाठी चित्रपटच नाही तर लहान मुलांमधूनच चित्रपट दिग्दर्शक घडवण्याचा एक नवा उपक्रम सोसायटीने हाती घेतला आहे. ‘लिटिल डिरेक्टर्स’ असे या उपक्रमाचे नाव असून देशभरातील शाळांच्या मदतीने लहान मुलांमध्ये दडलेल्या चित्रपटकर्मीचा शोध घ्यायचा, त्यांना प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांचे चित्रपट तयार करून ते प्रदर्शित करायचे असे या उपक्रमाचे स्वरूप असून त्यासाठी चिल्ड्रन फिल्म सोसायटीने पुण्याच्या नामांकित ‘एफटीआय’ संस्थेशी हातमिळवणी केली आहे.
‘चिल्ड्रन फिल्म सोसायटी’च्या या ‘लिटिल डिरेक्टर्स’ उपक्रमात ‘एफटीआयचे’  मान्यवर प्रशिक्षक देशभरातील निवडक शाळांमधून फिल्ममेकिंगच्या कार्यशाळा घेणार आहेत. या कार्यशाळांमधून निवड झालेल्या मुलांना प्रत्यक्ष चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. या उपक्रमासाठी योग्य वाटणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे शाळाही सोसायटीकडे किंवा एफटीआयकडे देऊ शकतात. योग्य त्या प्राथमिक तपासणीनंतर निवड झालेल्या मुलांना एफटीआयचे प्रशिक्षक चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्याचे प्रशिक्षण देत त्यांच्याकडून चित्रकृती तयार करून घेणार आहेत. या लहान मुलांनी तयार केलेले चित्रपट ‘चिल्ड्रन फिल्म सोसायटी’च्या यूटय़ूब चॅनेलवरून प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीने दिली आहे.‘लहान मुलांसाठी लहान मुलांचेच चित्रपट करणारी चिल्ड्रन फिल्म सोसायटी आता आणखी एक पाऊल पुढे जात लहान मुलांकडूनच चित्रपट तयार करून घेणार आहे’, अशा शब्दांत सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रवण कुमार यांनी ‘लिटिल डिरेक्टर्स’ उपक्रमाचे वर्णन के ले. लहान मुलांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला वाव मिळेल, अशा प्रकारे त्यांना फिल्ममेकिंगचे प्रशिक्षणही द्यायचे आणि त्यांना चित्रपटनिर्मितीची संधीही द्यायची अशा पद्धतीने त्यांना एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे, असे श्रवण कु मार यांनी सांगितले. याकामी, एफटीआयचे आपल्याला मोलाचे सहकार्य मिळणार आहे