मराठी चित्रपटात सुपर हिरो संकल्पना वेगळ्या फॉम्र्यूलामध्ये मांडण्याचा प्रयत्न ‘बाजी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी केला आहे. सुष्ट-दुष्ट सामना, सुपर हिरो अर्थातच सगळ्यांचा मसिहा आणि सत्चा प्रतिनिधी, खलनायक असत्चा प्रतिनिधी आणि अख्ख्या गावाला वेठीस धरणारा वगैरे सारे काही फॅण्टसीच्या अंगाने जाणारे दाखविण्यात आले असले आणि कल्पना चमकदार असली तरी त्यातून दुहेरी rv06भूमिकेचा ‘हटके’ फॉम्र्यूला मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. मात्र हे करताना प्रचंड लांबीचा सिनेमा बनला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट असला तरी तो प्रचंड लांबीमुळे कंटाळवाणाही ठरतो.
चिद्विलास आणि गौरी हे लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिणी श्रीरंगपूर या गावात राहतात. या गावाचे रक्षण काही शे वर्षांपूर्वी बाजी करीत होता अशी दंतकथा आहे. या गावावर आलेले संकट बाजीने आपल्या शूरपणाने अनेकदा परतवून लावले आहे अशी आख्यायिका असते. लहानपणी गौरीचे प्राण या बाजीनेच वाचविलेले असतात. त्यामुळे बाजीवर गौरीचे नितांत प्रेम आहे. गावावर संकट ओढवले तर तो नक्की येईल अशी तिची समजूत आहे. त्यामुळे चिदू अर्थात चिद्विलासचे प्रेम गौरी सुरुवातीला नाकारते. कारण चिदू हा भोळाभाबडा, भित्रा तरुण आहे. गौरी त्याला फक्त मित्र मानत असते. श्रीरंगपूर गावात मरतड या तरुणाला अचानकपणे खजिना सापडतो आणि मग तो आणखी खजिना शोधण्यासाठी सगळ्या श्रीरंगपूरला वेठीस धरतो. त्यांच्यावर अन्याय करतो. त्याच्यापासून गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी सगळे गावकरी बाजी अवतरण्याची वाट पाहतात.
सुपर हिरो फॅण्टसी ही संकल्पना आणि त्यावर आधारित असंख्य इंग्रजी-हिंदूी चित्रपट यामुळे पहिली मराठी सुपर हिरो फिल्म असे म्हणतानाच मात्र हा सुपर हिरो कोणतेही अजस्र, अमानवी, अचाट, अफाट असा नाही असे चित्रपटकर्त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार फॅण्टसी असूनही हा बाजी सुपर हिरो मात्र आहे. परंतु गौरीच्या मनातला सुपर हिरो आहे. श्रेयस तळपदेची चिद्विलास आणि बाजी अशा दुहेरी भूमिका आहेत. दुहेरी भूमिकांचा निराळा फॉम्र्यूला एकप्रकारे या चित्रपटाद्वारे आणताना आणि चित्रपट मनोरंजक करण्याचा प्रयत्न करताना दिग्दर्शकाने प्रचंड लांबीचा चित्रपट बनविला आहे. मध्यांतरापूर्वी व्यक्तिरेखांची ओळख आणि त्यांची नाती उलगडण्यावर बराच वेळ घालविला आहे. त्याचबरोबर दोन आयटम साँगही चित्रपटात हवी होती का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. प्रचंड लांबीमुळे चित्रपटाचा अपेक्षित परिणाम निश्चितपणे कमी जाणवतो. अमृता खानविलकरने साकारलेली गौरी चांगल्यापैकी सादर केली आहे. श्रेयस तळपदेचा हा ‘कमबॅक’ चांगला झाला आहे. मरतड या विकृत खलनायकाच्या भूमिकेद्वारे मराठीमध्येही खलनायक सरस ठरू शकतो हे जितेंद्र जोशीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. जितेंद्र जोशी भाव खाऊन गेला आहे हे नक्की. परंतु मरतड या व्यक्तिरेखेत मध्यांतरापूर्वी आणि मध्यांतरानंतर असा संपूर्ण बदल का केला असावा याचा अंदाज प्रेक्षकाला बांधता येत नाही.
चित्रपटाचा काळ आजचा आहे की कधीचा आहे हे मात्र सबंध चित्रपटात समजत नाही. त्याचबरोबर एकदम अचानक खलनायक शेंडीवाला आणि त्याचा संपूर्ण पेहराव जुन्या काळातील धोतर नेसलेला वगैरे दाखविण्यामागचा दिग्दर्शकाचा हेतू समजत नाही. गौरी, चिदू, चिदूचा छोटा मित्र, चिदूची आई सगळेच काळा पोषाख परिधान केलेले दाखविण्यामागचे कारण दिग्दर्शकाने स्पष्ट केलेले नाही. दिग्दर्शकाने चित्रपट आपल्या पद्धतीने बनवितानाच लोकप्रिय होण्यासाठी गाणी घातली आहेत, असे म्हणावे लागेल. चित्रपटाचे खटकेबाज संवाद यासाठी मात्र विशेष गुण द्यायला हवेत. बालकलाकार पुष्कर लोणारकर आणि श्रेयस तळपदेची जोडी गमतीदार आहे.
चमकदार फॅण्टसी चित्रपट बनविताना अनावश्यक आयटम साँगची फोडणी देऊन चित्रपटकर्त्यांनी लांबलचक दोन तास पन्नास मिनिटांचा चित्रपट बनविणे टाळले असते तरी चित्रपट अधिक रंजक ठरू शकला असता असे प्रेक्षकाला वाटल्यावाचून राहणार नाही.

बाजी
निर्माते – विवेक रंगाचारी, अरुण रंगाचारी, अमित अहिरराव, दीप्ती तळपदे, सुहृद गोडबोले, हृषीकेश कुलकर्णी, निखिल महाजन
लेखक-दिग्दर्शक – निखिल महाजन
संवाद – श्रीरंग गोडबोले
छाया लेखक – वासू राणे
संगीत – आतिफ अफझल
संकलक – अभिजीत देशपांडे
कलावंत – श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी, बालकलाकार पुष्कर लोणारकर, अमृता खानविलकर, इला भाटे, रवी जाधव, नागराज मंजुळे, मृण्मयी गोडबोले, श्रुती मराठे.

सुनील नांदगावकर