06 July 2020

News Flash

खिळवून ठेवणारा

मराठी चित्रपटांमध्ये नव्या पिढीतील तरुण दिग्दर्शक, कलावंत मोठय़ा प्रमाणावर पदार्पण करीत आहेत. ‘पोर बाजार’ या चित्रपटाद्वारे मनवा नाईक या अभिनेत्रीने दिग्दर्शक म्हणून रूपेरी पडद्यावर पदार्पण

| September 21, 2014 12:43 pm

मराठी चित्रपटांमध्ये नव्या पिढीतील तरुण दिग्दर्शक, कलावंत मोठय़ा प्रमाणावर पदार्पण करीत आहेत. ‘पोर बाजार’ या चित्रपटाद्वारे मनवा नाईक या अभिनेत्रीने दिग्दर्शक म्हणून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. आतापर्यंत मराठी, हिंदी चित्रपटांतून फारसा हाताळला न गेलेला नावीन्यपूर्ण विषय पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या नजरेतून मांडला आहे. करमणूक करण्याबरोबरच खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.
चित्रपटाच्या शीर्षकावरून महाविद्यालयात दाखल झालेल्या मुला-मुलींची धमाल असे वाटू शकेल. अजय, मंजिरी, विशाल, रागिणी आणि समर ही एकाच वर्गात शिकणाऱ्या मुला-मुलींची घट्ट मैत्री असून लेक्चरला बुट्टी मारून एकत्र भटकत धमाल मस्ती करतात. सायकल, मोटरसायकलवरून दररोज जवळपासच्या परिसरात फिरायला जायचे आणि ‘चिलआऊट’ करायचे हा या पाचही जणांचा नित्यक्रम बनला आहे. एकदा ते जवळपासच्या जंगलात फिरायला गेले असताना लहान मुलांना एका कोंदट घरात डांबल्याचे पाहतात. त्या लहान मुला-मुलींची अवस्था पाहिल्यानंतर पाचही जण घाबरतात, अस्वस्थ होतात. त्या मुलांना सोडविण्यासाठी एक योजना आखतात.
दिग्दर्शिकेने नावीन्यपूर्ण विषय नवीन कलावंत आणि त्या जोडीला लोकप्रिय कलावंतांना घेऊन चित्रपट केला आहे ही वाखाणण्याजोगी बाब आहे. पहिलाच चित्रपट असल्याने विषयाची मांडणी रंजक आणि रहस्यमय चित्तथरारक पद्धतीने केली आहे, असे म्हणता येईल. लहान मुलांच्या संदर्भातील विषयावर काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांच्या प्रश्नांकडे पौगंडावस्थेतील मुले कसे पाहतील हा विचार दिग्दर्शिकेने चांगल्या प्रकारे मांडला असला तरी हिंदी-मराठी चित्रपटांत आतापर्यंत न दाखविण्यात आलेला विषय मांडताना त्या समस्येचे गांभीर्य आणि आवाका, गुन्हेगारीची साखळी कुठपर्यंत जाते, आणि त्यात व्यवस्थेचा कसा हातभार लागत असतो याचे वेगवेगळे कोन दाखविणे अपेक्षित होते, ते मात्र कुठेही आलेले नाही. तरीसुद्धा लहान मुलांची तस्करी हा विषय मांडण्याचे धाडस दिग्दर्शिकेने पहिल्याच चित्रपटातून दाखविण्याचे ठरविणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, अतुल परचुरे यांची मुलगी सखील आणि मनोज जोशी यांचा मुलगा धर्मज या कलावंतांबरोबरच स्वरांगी मराठे आणि अनुराग वरळीकर अशी उदयोन्मुख तरुण कलावंतांची पाच जणांची फळी यामुळे चित्रपट ताजातवाना झाला आहे. या प्रमुख पाच जणांच्या जोडीला त्यांच्या प्राध्यापिकेच्या भूमिकेतील सई ताम्हणकर आणि प्रथमच खलनायकी छटेच्या भूमिकेतील अंकुश चौधरी, विकास पाटील अशा कलावंतांमुळे चित्रपट रंजक-नाटय़पूर्ण करण्यास मदत झाली आहे.
पौगंडावस्थेतील मुला-मुलींना अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींबद्दल असणारे कुतूहल मांडतानाच त्यांच्यातील अतिधाडसी वृत्ती केव्हा केव्हा कशा त्यांना संकटात टाकू शकतात हा मुद्दाही चित्रपटाच्या ओघाने नमूद करण्यात आला आहे. सुरुवातीला पाचही प्रमुख व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकांना करून देण्याची पद्धत जुनी आहे. त्याचप्रमाणे पटकथेमधून चित्रपटाचा मूळ विषय मांडताना गोंधळ झाल्याचे जाणवते. सखील परचुरे, अनुराग वरळीकर आणि स्वरांगी मराठे यांच्यासह सर्वच कलावंतांनी अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरतो.
व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत
पोर बाजार
निर्माते – अश्विनी दरेकर, एआरडी प्रॉडक्शन्स
दिग्दर्शिका – मनवा नाईक
पटकथा-संवाद – पराग कुलकर्णी
संगीत – शैलेंद्र भावे
गीते – गुरू ठाकूर
छायालेखन – धनंजय कुलकर्णी
संकलन – अपूर्वा आणि आशीष
कलावंत – सई ताम्हणकर, प्राजक्ता कुलकर्णी, स्वानंद किरकिरे, चिन्मयी सुमीत, चित्रा नवाथे, अनुराग वरळीकर, सत्या मांजरेकर, स्वरांगी मराठे, धर्मज जोशी, सखिल परचुरे, मृणाल पंतवैद्य, विकास पाटील, शंतनू गंगावणे, कमलाकर नाडकर्णी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2014 12:43 pm

Web Title: film review por bazaar
टॅग Entertainment
Next Stories
1 बेचव प्रेमकथा
2 सलमान कोटय़धीश
3 पोस्टमनचे भावविश्व ‘टपाल’ बंद
Just Now!
X