सातत्याने वेगळे कथानक, वेगळी मांडणी, वैविध्यपूर्ण विषय उत्तम कलावंतांना घेऊन प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिग्दर्शकाकडून निश्चितपणे अपेक्षा उंचावलेल्या असतात. परंतु, या अपेक्षांच्या कसोटीवर खरा न उतरलेला ‘सांगतो ऐका’ हा चित्रपट म्हणावा लागेल. फक्त उत्तम कलावंतांचा चांगला अभिनय मात्र पाहायला मिळतो. राजकारण, राजकारणी यांच्यावर टिप्पणी करणारा सज्जन सोंगाडय़ा जनतेच्या बाजूने असल्याचे दाखविणारा हा चित्रपट नावीन्याच्या अभावी सरधोपटपणे साकारला आहे.
आंबट नावाच्या एका दारुडय़ा सोंगाडय़ाची ही गोष्ट. सोंगाडय़ा म्हटला की तमाशाचा फड येतोच. तसाच तो इथेही आहे. परंतु, गोष्ट संपूर्णपणे सोंगाडय़ाभोवतीच फिरणारी आहे. महाराष्ट्रभर सध्या निवडणुकीचा हंगाम ऐन भरात असून त्याला अनुसरून चित्रपटाची गोष्ट आणि प्रामुख्याने संवाद यावर भर देणाऱ्या हा सोंगाडय़ाच्या नजरेतून दिग्दर्शकाने चित्रपट दाखविला आहे.
आंबटराव हा सोंगाडय़ा म्हणजे अट्टल दारुडय़ा. फडावरची लावणी संपली की तमाशाचे प्रेक्षक हमखास आंबटला पाचारण करण्यासाठी फड डोक्यावर घेतात. सोंगाडय़ा म्हणजे जे बोलेल ते तिरकसच, त्यामुळे प्रेक्षकांची तोंडं आंबट होतात म्हणून याचे नावच ठेवले आंबट. तर हा आंबट एका पोलीसी लफडय़ात सापडतो आणि त्यातूनही तो कसा हिरो बनतो त्यावर सगळा चित्रपट बेतलेला आहे.
सचिन पिळगावकरांनी आंबट ही प्रमुख भूमिका जबरदस्त ऊर्जेने उत्तम वठवली आहे. पांडू हवालदार छापाच्या पोलीसी व्यक्तिरेखांद्वारे भाऊ कदम आणि वैभव मांगले यांनी धमाल उडवून दिली आहे. कांबळवाडी या गावात घडणाऱ्या या गोष्टीत मध्यवर्ती भूमिकेत अण्णासाहेब थोरात यांचा पुतळा असून त्यांची दोन मुले सरपंच निवडणुकीत जिंकण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राजकीय प्रहसन स्वरूपाचा हा चित्रपट असला, गावच्या टिनपाट सरपंचपदासाठी दोघा सख्ख्या भावांच्या टोळीचा संघर्ष, गावातील शाळा, गावचे प्रश्न यांच्याकडे दुर्लक्ष करणारे सर्वपक्षीय राजकारणी लोक आणि सारे काही अपरिहार्यतेने सहन करणारी गोरगरीब जनता हे सारे जुनेच दळण लेखकाने या चित्रपटात दळले आहे.  घटकाभर करमणूक करणारा चित्रपट असला तरी दिग्दर्शकाने प्रचारकी पद्धतीने चित्रपट केल्याने ही कलावंतांची भट्टी उत्तम जमली असली तरी चित्रपटाचा एकूण परिणाम फिका पडतो.
गावातले राजकारण, जिल्हा रुग्णालयाची अवस्था, राजकारण्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा सोंगाडय़ाचा प्रयत्न, अख्खा गाव आपल्याच दावणीला बांधल्याच्या आविर्भावात फिरणारे झुंजारराव आणि विक्रमराव या व्यक्तिरेखा काय किंवा सखाराम पालव, सुभाष खर्डे या पोलिसांच्या व्यक्तिरेखा काय, फडाचा मालक, त्याची मुलगी, तिचे दु:ख या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनी तमाशापटांमध्ये यापूर्वी अनेकदा पाहिलेल्या आहेत. त्यामुळे नव्या बाटलीत जुनीच दारू भरण्याचा प्रयत्न झाला आहे. कथा-पटकथेतील नावीन्याचा अभाव यामुळे सरधोपट पद्धतीने चित्रपटाचा नायक असलेला सोंगाडय़ा जनतेची व्यथा मांडत ‘हिरो’ ठरतो हा जुनाच फॉम्र्युला दिग्दर्शकाने मांडला आहे. इंग्रजी संवाद बोलण्याचा हव्यास असणाऱ्या सुभाष खर्डे या व्यक्तिरेखेद्वारे भाऊ कदम भाव खाऊन गेला आहे.
सांगतो ऐका
निर्माती – विधी कासलीवाल
दिग्दर्शक – सतीश राजवाडे
कथा-पटकथा – पराग कुलकर्णी
संवाद – संजय पवार
छायालेखन – सुहास गुजराथी
संगीत – अविनाश-विश्वजीत
कलावंत – सचिन पिळगावकर, जगन्नाथ निवंगुणे, भाऊ कदम, मिलिंद शिंदे, वैभव मांगले, विजय चव्हाण, माधव अभ्यंकर,  संस्कृती बालगुडे, किसना घोलप व अन्य.

    

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!