17 January 2019

News Flash

गुंतागुंतीचा तरीही पाहण्याजोगा ‘सौ. शशी देवधर’

मराठी चित्रपटात वेगवेगळे विषय, चांगले कलावंत, आशयपूर्ण मांडणी यांची सध्या रेलचेल आहे, असे म्हणायला हरकत नाही. अशाच चांगल्या चित्रपटांपैकी एक 'सौ. शशी देवधर'.

| February 21, 2014 11:00 am

मराठी चित्रपटात वेगवेगळे विषय, चांगले कलावंत, आशयपूर्ण मांडणी यांची सध्या रेलचेल आहे, असे म्हणायला हरकत नाही. अशाच चांगल्या चित्रपटांपैकी एक ‘सौ. शशी देवधर’. गुंतागुंतीचे कथानक असले, तरीही खिळवून ठेवणारा हा चित्रपट. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या बोल्ड अभियासाठी प्रसिद्ध असलेली सई ताम्हणकर एका वेगळ्याच रुपात ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटात पाहायला मिळते. ती प्रथमच साडी नेसून पडद्यावर दिमाखात आणि आत्मविश्वासाने वावरली आहे. तिचे हे सरप्राईज रूप प्रेक्षकांना आवडेल.

मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत आणि या प्रयोगांना लोकांची पसंती मिळते आहे. याच रांगेतील वेगळ्या धाटणीचा, वेगळी आणि गुंतागुंतीची कथा असलेला सिनेमा म्हणजे ‘सौ. शशी देवधर’. सिनेमाची कथा शुभदा (सई ताम्हनकर) या पात्रभोवती फिरते. पावसाळ्यातील एका रात्री अजिंक्य वर्तकच्या (अजिंक्य देव) गाडीची टक्कर पावसात चिंब भिजलेल्या शुभदाला (सई ताम्हनकर) लागते. तो तिला रुग्णालयात नेतो. ती शुद्धीवर येताच सुरु होतो एक प्रवास ….. तिचा आणि अजिंक्य वर्तकचाही. स्वतःला शशी देवधरची पत्नी म्हणवून घेणारी शुभदा तिची ओळख पटवून देण्यात वेळोवेळी अपयशी ठरते. ती शुभदा नसून आपली पत्नी निलिमा आहे, हे सांगणा-या नव्या पात्राने केलेली एंट्री कथेला एक वेगळीच कलाटणी देते. त्यानंतर शोध सुरु होतो तो शुभदाची खरी ओळख शोधण्याचा. हा उलगडा सोडवण्यासाठी पोलिसांसोबत अजिंक्यही धडपड करू लागतो. शुभदाने रेखाटलेल्या चित्रांच्या साह्याने तिच्या पतीचा शोध लावण्यात येतो. पण त्यालाही ती पती मानण्यास नकार देते. अजिंक्य हा मानसोपचारतज्ज्ञ दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे शुभदाच्या आयुष्याचे गूढ तो आपल्या पद्धतीने सोडवायचे ठरवतो.

मध्यांतरापर्यन्त ही सौ. शशी देवधर कोण आणि तिचे असे का झाले असावे, याचा अंदाज बांधण्यात प्रेक्षकांची उत्कंठा कायम राहते. मध्यांतरानंतरचा सिनेमा हा सौ. शशी देवधरला नेमके झाले आहे, याचे कुतूहल, याची उकल सिनेमा कशी करणार याच उत्सुकतेने उलगडत जातो. दोन टप्प्यात हा सिनेमा आहे, असे म्हणता येईल.
चित्रपटाची गोष्ट छोटीशी आहे. पण ती प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडते. दुहेरी व्यक्तिमत्व जगणाऱया स्त्रीच्या भूमिकेला सईने पूरेपूर न्याय दिलाय, असे म्हणण्यास हरकत नाही. तिला तितकीच साथ दिली ती अजिंक्य देव याने. त्याच्यासोबत तुषार दळवीची भूमिकाही महत्वाची ठरते. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘रंग तू..’ हे प्रेमगीत कर्णमधूर आहे. नायिकेवर असलेले आपले प्रेम आत्ता व्यक्त करू की नको, अशा पेचात पडलेल्या नायकाची मनःस्थिती या गाण्यात दाखविण्यात आली आहे. गुंतागुंतीचा आणि पुढे काय घडेल, असा विचार करण्यास भाग पडणारा ‘सौ. शशी देवधर’ एकदा पाहावा असा सिनेमा आहे.

‘सौ. शशी देवधर’
निर्माती – शिल्पा शिरोडकर
कथा-दिग्दर्शन – अमोल शेटगे  
पटकथा – अमोल शेटगे, शर्वानी-सुश्रुत
संकलक – राजेश राव
संगीत – टबी-परीक
कलावंत – सई ताम्हणकर, तुषार दळवी,अजिंक्य देव,अविनाश खर्शीकर, अविनाश केळकर

First Published on February 21, 2014 11:00 am

Web Title: film review sau shashi deodhar