राज्य सरकारने घातलेल्या नव्या निर्बंधांनुसार पुढील दोन आठवडे चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणावर बंदी आहे. सध्या आठवड्याभराचे भाग दाखवता येतील इतकेच चित्रीकरण वाहिन्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून चित्रीकरणास परवानगी देण्याबाबत वाहिन्या आग्रही आहेत.

मालिकांचे चित्रीकरण बुधवारी रात्रीपासूनच बंद करण्यात आल्याने निर्माते किं वा दूरचित्रवाहिन्यांना अधिकचे भाग चित्रित करण्याएवढा पुरेसा वेळ मिळालेला नाही. सर्वसाधारणपणे पुढच्या सात दिवसांचे चित्रीकरण आधीच के ले जाते. त्यामुळे पुढचा आठवडा प्रेक्षकांना हे नवीन भाग दाखवता येतील. त्यानंतर मात्र आहेत त्या मालिकांचे जुने भाग दाखवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. गेल्या वर्षीही चित्रीकरण बंद झाल्यामुळे मालिकांचे प्रक्षेपण थांबवावे लागले होते.

आमच्याकडे चित्रित झालेले जेवढे भाग आहेत ते लवकरात लवकर संकलन करून प्रसारणासाठी तयार कसे ठेवता येतील, यासाठी सध्या धावपळ सुरू आहे. त्यानंतर काय करायचे यावर अद्याप चर्चा सुरू असून, लवकरच जुने भाग दाखवणे किं वा जुन्या मालिका, कार्यक्रमांचे पुन:प्रसारण असे तत्सम उपाय योजावे लागतील, अशी माहिती ‘झी मराठी’ वाहिनीच्या सूत्रांनी दिली.

सुरक्षितपणे चित्रीकरण शक्य

मराठी मालिकांच्या सेटवर जास्तीत जास्त ५० ते ७० माणसे असतात, तर हिंदी मालिकांच्या सेटवर शंभर – सव्वाशेच्या आसपास कर्मचारी असतात. गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक नियमांनुसार कमीतकमी उपस्थितीत आणि सगळे नियम पाळून चित्रीकरण के ले जाते. तसेच मुंबई आणि परिसरात जिथे- जिथे मालिकांची चित्रीकरणे सुरू आहेत ती वेगवेगळ्या जागी आहेत. मढ, चित्रनगरी, मीरा-भाईंदर, नायगाव, ठाणे अशा वेगवेगळ्या शहरांत किं वा सावंतवाडी, कोल्हापूर, सांगली – सातारा अशा दूरच्या परिसरात आणि एकमेकांपासून दूर असलेल्या स्टुडिओमध्ये मालिकांची चित्रीकरणे सुरू आहेत. त्यामुळे सेटवर संसर्गाचा फारसा प्रश्नच येत नाही. त्यातही ‘बबल’ पद्धतीने सेटच्या आसपासच कलाकार-कामगारांची राहण्याची सोय पूर्ण करून तिथे बाहेरचा दुसरा कोणीच येणार नाही, याचे नियोजन करून चित्रीकरण के ले जाऊ शकते. आठवड्याभराने अशा पद्धतीने चित्रीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याचा निर्मात्यांचा विचार सुरू आहे, अशी माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली.

बाहेरगावचे कलाकार घरी परतणार

सध्या अनेक मालिकांचे चित्रीकरण मुंबईबाहेर सावंतवाडी, कोल्हापूर, सांगली – सातारासारख्या परिसरात के ले जाते. दोन आठवडे चित्रीकरणच बंद राहणार असल्याने सगळ्या कलाकारांना सुखरूप आणि योग्य पद्धतीने आपल्या घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही वाहिनीच्या सूत्रांनी दिली.

साडेसहा हजार जणांच्या चाचण्या

राज्य सरकारने गेल्या आठवड्यात दर १५ दिवसांनी सेटवरील कलाकार, कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जवळपास साडेसहा हजार जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यातील काही जणांचे अहवाल उपलब्ध झाले आहेत तर काहींचे या आठवड्यात उपलब्ध होतील. या चाचण्यांपैकी बाधितांचे प्रमाण हे के वळ ५ ते ६ टक्के असून बाधितांना विलगीकरणात ठेवून चित्रीकरण करणेही निर्मात्यांना शक्य आहे. आम्ही दर आठवड्याला चाचण्या करण्यासही तयार आहोत. या आठवड्याला चाचण्यांचे अहवाल जमा होतील. त्यानंतर सुरक्षित वातावरणात चित्रीकरण करण्याची परवानगी मागण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याचेही नितीन वैद्य यांनी सांगितले.