बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटाच्या चित्रिकरणाला गुरुवारपासून सुरुवात झाली. शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून भारत आणि बांगलादेश यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बंगबंधू’ या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून दादासाहेब फाळके  चित्रनगरीत गुरुवारी या चित्रपटाचे मुहूर्त दृश्य घेण्यात आले.

भारत आणि बांगलादेश यांच्यात दृक्श्राव्य सहनिर्मिती करारांतर्गत या चित्रपटाच्या निमिर्तीची घोषणा गेल्यावर्षी १४ जानेवारीला करण्यात आली होती. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि बांगलादेश चित्रपट विकास महामंडळ यांच्यात या चित्रपटनिर्मितीचा करार झाला होता. करारानुसार गेल्यावर्षी मार्च महिन्यात बांगलादेशमध्ये चित्रिकरणाचा पहिला टप्पा पार पडणार होता, मात्र करोनामुळे हे चित्रिकरण सुरू होऊ शकले नाही. आता दादासाहेब फाळके  चित्रनगरीत या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रिकरणाला सुरुवात झाली असल्याची माहिती दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील चित्रिकरण एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर उर्वरित चित्रिकरण बांगलादेशमध्ये करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे काम वेगाने सुरू झाले असून त्यातच आपण व्यग्र आहोत. चित्रिकरणाचा अर्धा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला चित्रपटाविषयी सविस्तर माहिती देता येईल, असे बेनेगल यांनी स्पष्ट केले.

ऐतिहासिक महत्त्व..

* बांगलादेश स्वतंत्र व्हावा यासाठी शेख मुजीबूर रहमान यांनी दिलेला लढा, त्यासाठी भारताने बांगलादेशला दिलेले सहकार्य याचा इतिहास खूप मोठा आणि तितकाच महत्त्वाचा आहे. बांगलादेश स्वतंत्र झाल्यापासून या दोन्ही देशांत मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

* दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय नागरिकत्व दुरूस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सहकार्यातून तयार होत असलेल्या ‘बंगबंधू’ या चित्रपटाक डे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

* या चित्रपटात बांगलादेशी कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. बांगलादेशी अभिनेते आरिफिन शुवू हे या चित्रपटात शेख मुजीबूर रहमान यांची भूमिका साकारणार आहेत. अतुल तिवारी आणि शमा झैदी यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संगीत शंतनू मोईत्रा यांचे असणार आहे.