संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाचा वाद बराच चिघळला असून, सध्या या चित्रपटाच्या बाबतीत प्रत्येक कलाकार आपली भूमिका स्पष्ट करत आहे. यातच आता अभिनेते आणि एफटीआयआयचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनीही आपले मत मांडले आहे. ‘पद्मावती ही एक नर्तिका नव्हे तर, महाराणी होती. पण, संजय लीला भन्साळी तिला नर्तिकेच्या रुपात चित्रपटाच्या माध्यमातून सादर करु पाहात आहेत,’ असे चौहान म्हणाले.

‘त्यांनी या चित्रपटाचे कथानक काल्पनिक असल्याचे कधीच म्हटले नाही. त्यामुळे इतिहासात जे काही नमूद करण्यात आले आहे, त्यानुसारच त्यांनी चित्रपटाची आखणी केली असून पद्मावतीला एका नर्तिकेच्या रुपात सर्वांसमोर आणले ते पूर्णपणे चूक आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
निर्मात्यांनी ही एक काल्पनिक कथा असल्याचे कधीच म्हटले नाही. इतिहासाची मदत घेऊन त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटात पद्मावतीला एक नर्तिका दाखण्यात आले आहे. लोकांचा नेमक्या याच गोष्टीला विरोध आहे. ती नर्तिका नसून एक राणी होती. राजा आणि राणी कधीही सर्वांच्या समोर उभे राहून नाचत नसत, असे चौहान यांनी ‘एएनआय’शी बोलताना म्हटले.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

त्यामुळे ट्रेलर पाहूनच चित्रपटात आणखी काय चुकीचे दाखवले जाणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण संपूर्ण सिनेमा पाहिल्याशिवाय असा अंदाज वर्तवणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला अनेक संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दीपिका, संजय लीला भन्साळी आणि रणवीर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.