फिल्ममेकर आणि अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला आहे. हा दिवस तिने आपल्या मुलांसोबत वेळ घालवत साजरा केला आणि त्यासोबत तिने एक खास गोष्टही केली, ज्याचा व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती आपली मुले विराजवीर आणि वरुष्का यांच्यासोबत गार्डनिंग करताना दिसत आहे. “आम्ही कालचा दिवस चेरी टोमॅटोची लागवड करून साजरा केला. निसर्गाचा सोहळा किंवा महिला दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी कोणत्याही ठराविक दिवसाची गरज नाही. पण आम्ही आज केकही बनवला. मला फक्त वेळ काढण्यासाठी आणि माझ्या मुलांसोबत मजा मस्ती करण्यासाठी एक कारण हवं आहे”, असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.

महिलादिनी ताहिराने महिलांनी आपली काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं.  “स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मी प्रामाणिकपणे तुम्हाला विचारत आहे की, तुम्ही स्वतःची पुरेशी काळजी घेता का? ह्याच माझ्या महिला दिनाच्या शुभेच्छा आहेत”, असंही ती तिच्या पोस्टमध्ये म्हणत आहे.

“मी तुम्हालाही विचारते आणि स्वतःलाही रोज हा प्रश्न विचारते की, तुम्ही तुमची काळजी घेत आहात का?”, असंही ती पुढे म्हणते.

ताहिरा सध्या एकता कपूर, गुनीत मोंगा, एकता कपूर आणि रुचिका कपूर या निर्मात्यांसोबत भारतीय महिलांबद्दलच्या एका सिनेमा कलेक्टिव्हसंदर्भात काम करत आहे. त्यांच्या बिट्टू ह्या शॉर्टफिल्मसाठी ऑस्कर नामांकन मिळालं होतं.