मनोरंजनातून प्रबोधन हे पौराणिक मालिकांच्या माध्यमातूही उत्तमपणे साध्य केले जाऊ शकते, हे निर्माता-दिग्दर्शक रवि चोप्रा यांनी ‘महाभारत’सारख्या महामालिकेची निर्मिती करून दाखवून दिले होते. मालिका असोत वा चित्रपट त्यांच्या माध्यमातून नेहमी आपली नीतीमूल्ये, संस्कार यांचे चित्रण करणाऱ्या रवि चोप्रा यांचे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ब्रीच कँडी रूग्णालयात निधन झाले. त्यांना फुफ्फुसांचा आजार होता. गेली काही वर्ष त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या आठवडय़ात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ६८ वर्षीय चोप्रा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून गुरूवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचे सुपूत्र आणि यश चोप्रा यांचे पुतणे ही रवि चोप्रा यांची पहिली ओळख. रवि चोप्रा यांनी आपल्या वडिलांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरूवात के ली होती. दूरचित्रवाहिनीवर १९८८ साली आलेल्या ‘महाभारत’ या महामालिकेमुळे त्यांचे नाव घराघरात पोहोचले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ‘चोप्रा’ घराण्याशी नाळ जोडलेली असूनही दिग्दर्शक म्हणून रवि चोप्रा यांनी निवडक चित्रपट आणि मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. ‘महाभारत’ नंतर रवि चोप्रा यांनी ‘मां शक्ति’ आणि ‘विष्णू पुराण’ या पौराणिक मालिकांची निर्मिती केली होती. मात्र. ‘महाभारत’ मालिकेला जे यश मिळाले होते तेवढे यश त्यांच्या कुठल्याच मालिकेला मिळाले नाही. ‘महाभारत’ने छोटय़ा पडद्यावर इतिहास घडवला.
त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये रवि चोप्रा हे नाव घेतले की ‘बागबान’ चित्रपटाचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रवि चोप्रांनी आजच्या पिढीतील मुले आणि आईवडिलांच्या नात्याबद्दल सडेतोड भाष्य के ले होते. २००९ पासून चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर गेल्या वर्षी फॉक्सकडून रवि चोप्रा यांना या चित्रपटासाठी हिरवा कंदिल मिळाला होता.
बऱ्याच वर्षांनंतर छोटय़ा पडद्यावर पौराणिक मालिका करण्याचाही त्यांचा मानस होता. ‘वासुदेव कृष्ण’ नावाची मालिका घेऊन ते परतणार अशी चर्चा होती.
दिलखुलास व्यक्तिमत्व
नितीश भारद्वाज (अभिनेता)-रवी चोप्रा हे अत्यंत दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व होते. ‘महाभारत’ नंतर मी त्यांच्याबरोबर ‘रामायण’, विष्णुपुराण’ आदी मालिका केल्या. चित्रीकरणाच्या वेळेसही अत्यंत हसतखेळत काम करण्याची त्यांची पद्धत होती. ‘महाभारत’ मालिकेत ‘कृष्ण’ ही भूमिका साकारताना, मला सर्जनशिलतेचे स्वातंत्र्य (क्रिएटिव्ह फ्रीडम) द्या, ही भूमिका मला माझ्या पद्धतीने आणि विचाराने साकारू दे, अशी विनंती त्यांना केली होती. चोप्रा यांनी कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या विनंतीला होकार दिला आणि त्यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नाही. ही भूमिका मला माझ्या पद्धतीने करण्यास परवानगी दिली. कलाकारांनी कोणतीही नवी कल्पना सांगितली, नवीन काही सुचविले तर ते खुलेपणाने स्वीकारत असत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता.