चीनमधील वुहान शहरातून फैलाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगभरात हातपाय पसरले आहेत. भारत, अमेरिका, इराण, इटली या सारख्या अनेक देशांमध्ये या विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सरकार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. यामध्येच काही अफवादेखील पसरत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच प्राण्यांमुळे करोनाचा प्रसार वाढत असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे. त्यामुळेच आतापर्यंत अनेकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांना सोडून दिल्याचं समोर आलं आहे. याच कारणास्तवक चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याने आपल्या मुक्या जनावरांना असं वाऱ्यावर सोडू नका, असं आवाहन केलं आहे.

रोहित शेट्टीने नागरिकांना आवाहन करत एक इन्फ्रोग्राफीक शेअर करत कुत्र्यांपासून करोनाचा प्रसार होत नसल्याचं म्हटलं आहं. इतकंच नाही तर त्याने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनकडून या गोष्टीची खात्री करुन घेतल्यानंतरच त्याने ही पोस्ट शेअर केल्याचं म्हटलं आहे.

“सध्या जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला घाबरुन जाऊ नका. हा विषाणू कुत्र्यांमुळे किंवा प्राण्यांमुळे पसरत नाहीये. त्यामुळे आपल्या मुक्या पाळीव प्राण्यांना असं वाऱ्यावर सोडू नका”,असं रोहितने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारला मदत व्हावी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करता यावी यासाठी रोहित शेट्टीने एक लघुपट तयार केला आहे. या लघुपटातून या कलाकारांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसचं या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करु नयेत हेदेखील सांगितलं आहे.