बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे. गेल्या वर्षभरात ‘पॅडमॅन’, ‘संजू’, ‘सुरमा’, ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ असे अनेक चित्रपट आले. तर या वर्षात ‘ठाकरे’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘मणिकर्णिका’, ‘सूपर ३०’ असे अनेक मोठे बायोपिकही येणार आहेत. विशेष म्हणजे लवकरच इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जीवनावरदेखील बायोपिक येणार आहे.
दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी नारायण मूर्ती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अखेर आठ महिन्यांनंतर मूर्ती यांनी चित्रपटाला संमती दिली आहे. या चित्रपटात सत्याचा विपर्यास करू नये ही साधी पण महत्त्वाची अट ठेवत मूर्ती यांनी चित्रपटाला संमती दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी संजय त्रिपाठींनी नारायण मूर्ती यांना बायोपिकची कल्पना बोलून दाखवली होती. अनेक भेटीगाठी झाल्यानंतर मूर्ती यांनी बायोपिक काढण्यास मंजूरी दिली असल्याची माहिती मिळत आहे.
यापूर्वी मणिरत्नम् यांनी २००७ मध्ये धीरुभाई अंबानी यांच्या आयुष्यावर गुरू हा चित्रपट काढला होता. आतापर्यंत राजकारणी, खेडाळू यांच्यावर बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक झाले मात्र यशस्वी व्यावसायिकाच्या आयुष्यावर क्वचितच चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडमध्ये झाली असेल त्यामुळे नारायण मूर्ती यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. इन्फोसिस सारखी मोठी कंपनी कशी उभी केली, त्यांची यशोगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 11:49 am