अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्विंकल खन्ना ही आपली मते बेधडकपणे मांडण्यासाठी लोकप्रिय आहे. नुकतंच तिने एका कार्यक्रमात स्वत:च्या चित्रपटांबद्दल आश्चर्यकारक विधान केलं आहे. ज्या ज्या चित्रपटांमध्ये मी मुख्य भूमिका साकारली आहे, त्या सर्व चित्रपटांवर बंदी आणा, असं ती म्हणाली. ट्विंकलच्या अशा वक्तव्यावर अनेकांनीच आश्चर्य व्यक्त केलं.

ट्विंकलने तिच्या एका नव्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केलं. तुझ्या कोणत्या चित्रपटाचा रिमेक व्हावा असं तुला वाटतं असा प्रश्न तिला या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने या प्रश्नाचं उत्तर विनोदी शैलीत दिलं. ‘मी आतापर्यंत एकही हिट चित्रपट दिलेला नाही. मला वाटतं माझ्या सर्व चित्रपटांवर बंदी आणायला हवी. जेणेकरून परत कोणीच ते पाहू शकणार नाहीत. पण मी लिहिलेल्या कथांवर आधारित नक्कीच चित्रपटाची निर्मिती होऊ शकते,’ असंही ती म्हणाली. ट्विंकलच्या विधानांतून बऱ्याचदा तिच्या विनोदबुद्धीचा प्रत्यय येत असतो. चालू घडामोडींवर तिने केलेली उपरोधिक टीका किंवा वक्तव्यसुद्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

वाचा : आमिरने वाचवले ‘दंगल’च्या इंजीनिअरचे प्राण; सोशल मीडियावर कौतुक

ट्विंकलने लिहिलेल्या ‘पायजामाज आर फॉर गिविंग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या पुस्तकाबद्दल ती म्हणाली की, ‘स्वत: साठी पुरुष शोधण्यात रुची नसलेल्या स्त्रीला तुम्ही या पुस्तकात भेटाल. हे पुस्तक अत्यंत हलक्या फुलक्या भाषेत आणि नर्म विनोदी शैलीत लिहिण्यात आलं आहे.’