सुभाष घई यांचे मत

देशातील वातावरण जसे बदलते तसा चित्रपट देखील बदलतो. आता देशाची वाटचाल जागतिकीकरणाकडे होत आहे. त्यामुळे चित्रपटातही त्याचे प्रतिबिंब दिसत असून चित्रपटांचे संगीतही जागतिक स्वरूपाचे होत आहे. लेखक आणि दिग्दर्शक यांना समाजात काय घडत आहे याची जाण असायला हवी. जसा चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, तसाच चित्रपट समाजावर परिणामही करीत असतो. त्यामुळे चित्रपट बनविणाऱ्यांनी या जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित ‘कँडीड टॉक्स’ या कार्यक्रमात समर नखाते यांनी सुभाष घई यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ‘चित्रपट आणि समाज’ या विषयावर घई यांनी विचार मांडले.

घई म्हणाले, कलात्मक चित्रपट सामान्य माणसाची भाषा बोलतो. तर व्यावसायिक चित्रपट सामान्य माणसासाठी बोलतो. या दोन प्रकारांमध्ये चित्रपट, संगीत अशा प्रत्येक गोष्टीची शैली स्वतंत्र असते. व्यावसायिक चित्रपट चित्रपटगृहाच्या ‘स्टॉल’ मध्ये बसलेले, ‘बाल्कनी’मध्ये बसलेले प्रेक्षक या सगळ्यांचा विचार करून बनवायचा असतो. त्याच बरोबर आपल्या समाजातील प्रादेशिक वैविध्य लक्षात ठेवावे लागते. त्यामुळे व्यावसायिक चित्रपट बनविणे जास्त अवघड आहे.

‘फिल्म अँड टेलिविजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मध्ये शिकत असताना ऋत्विक घटक हे माझे आदर्श होते. सतत त्यांचे निरीक्षण मी करीत असे. पुढे चित्रपट बनविताना जेव्हा ‘काय करावे’ असा प्रश्न पडला, तेव्हा मी घटक यांना आठवायचा प्रयत्न करीत असे. त्यांनी ती गोष्ट कशी केली असती असा विचार करून मी त्या परिस्थितीवर मार्ग काढत असे. राज कपूर, बिमल रॉय, मेहबूब खान, गुरुदत्त या सर्वाकडून मला खूप शिकायला मिळाले, अशी भावनाही घई यांनी बोलून दाखविली.