गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्यानंतर कलाविश्वातील ‘मोस्ट हॅपनिंग कपल’च्या यादीत येणाऱ्या जोड्यांवरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या. अशाच चाहत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहुजा. गेल्या काही दिवसांपासून सोनमच्या लग्नाची जोरदार चर्चा असून त्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. अखेर या सर्व चर्चांवर सोनमनंही मौन सोडलं असून फार खर्च न करता साध्या पद्धतीन लग्न करणार असल्याचं तिने म्हटलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोनम म्हणाली की, ‘थाटामाटात लग्नापेक्षा मी पारंपरिक पद्धतीने साध्या लग्नसोहळ्याला प्राधान्य देईन. परदेशात किंवा इतर कोठेही हा सोहळा आयोजित न करता मी माझ्या घरीच विधीवत लग्नास पसंती देईन.’ विवाहसोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करणं म्हणजे केवळ उधळपट्टी आहे असं तिचं मत आहे.

वाचा : येरवड्यातून बाहेर आलेला ‘संजू’ म्हणतोय, ‘अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है’

सूत्रांच्या माहितीनुसार, ७ मे रोजी मुंबईत सोनम आणि आनंद लग्नगाठ बांधणार आहेत. कलाविश्वातील सेलिब्रिटीही सोनमच्या लग्नाला हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये करीना कपूर, स्वरा भास्कर, आलिया भट्ट, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, सैफ अली खान, करिष्मा कपूर, करण जोहर, रणबीर कपूर आणि इतरही सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.