अभिनेत्री तापसी पन्नू आणि चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली होती आणि त्यामुळेच आयकर विभागाने त्यांना लक्ष्य केले आहे हा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला. यापूर्वी बुधवारी प्राप्तिकर विभागाने अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्याशी संबंधित असलेल्या जागांवर छापे टाकले. मुंबई व पुण्यातील ३० पेक्षा जास्त ठिकाणी शोध घेण्यात आला.

त्या दोघांपैकी एकाचेही नाव न घेता निर्मला सीतारामन म्हणाल्या की, २०१३ मध्येही छापा टाकण्यात आला होता पण त्यानंतर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही. त्या म्हणाल्या, “जेव्हा आधीच्या सरकारने त्यांच्यावर छापा टाकला तेव्हा कोणाला कोणतीही अडचण नव्हती. परंतु या सरकारमध्ये हा एक चर्चेचा मुद्दा बनला आहे.”

२०१३ मध्ये काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात अनुराग कश्यप आयकर विभागाच्या नजरेखाली होते, अशा वृत्ताचा संदर्भ निर्मला सीतारामन यांनी दिला. विभागाने अनुराग कश्यपवर कर चुकवल्याचा आरोप केला होता.

अनुराग, तापसीच्या मागे आयकरचा ससेमिरा; पुण्यातील हॉटेलमधून पिंपरी चिंचवडमध्ये झाले शिफ्ट

अलीकडच्या काही महिन्यांपासून कश्यप आणि पन्नू हे केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करीत होते आणि सोशल मीडियाद्वारे वारंवार त्यांचे विचार जनतेसमोर मांडत होते. या दोघांना त्यांच्या राजकीय मतांसाठी सरकारने लक्ष्य केले असल्याचा आरोप मोदी सरकारच्या टीकाकारांनी केला. निर्मला सीतारामन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.