‘बेबी डॉल’ या गाण्यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका कनिका कपूर सध्या अडचणीत आली आहे. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने तिच्याविरुद्ध फसवणुकीचा एफआयआर दाखल केला आहे.

नोएडामधील उद्योजक मनोज शर्मा यांनी २२ जानेवारी रोजी अलीगढ येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी त्यांनी गायिका कनिका कपूरला परफॉर्मन्ससाठी आमंत्रित केले होते. यासाठी त्यांनी कनिकाला २४ लाख ९५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम देखील दिली होती. मात्र, कनिकाने या कार्यक्रमाला उपस्थित न राहता घेतलेले पैसे देखील परत करण्यास नकार दिला. त्यामुळे मनोज शर्मा यांनी तक्रार दाखल केली आहे.

वाचा : ‘केसरी’साठी खिलाडी कुमारने केला ‘या’ गोष्टीचा त्याग

याप्रकरणी कनिका, तिची मॅनेजर श्रुती आणि मुंबईस्थित कंपनीचे व्यवस्थापक संतोष मिजगेर यांच्याविरुद्ध (कलम ४२०) फसवणूक करणे, (कलम ४०६) विश्वासघात करणे आणि (कलम ५०७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिका न आल्याने कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असून मनोज शर्मा मानहानीचा खटला दाखल करण्याच्या विचारात असल्याचेही सांगण्यात येत आहे.