बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांच्याविरोधात बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुजफ्फरपूरमध्ये सोमवारी रात्री एका शाळेच्या आवारात कुमार सानू यांची कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. रात्री दहा वाजल्यानंतरही लाऊडस्पीकर सुरू ठेवल्याने स्थानिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, कॉन्सर्टचे आयोजक अंकित कुमार आणि कुमार सानू यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कॉन्सर्टमध्ये पहाटेपर्यंत परफॉर्मन्स सुरूच होते. त्यावेळी काही स्थानिकांनी लाऊडस्पीकरमुळे त्रास होत असल्याची तक्रार दाखल केली.

‘आशिकी’ चित्रपटातील धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, ‘परदेस’मधील ‘मेरी मेहबुबा’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’मधील ‘चुरा के दिल मेरा’ यांसारखी सुपरहिट गाणी कुमार सानू यांनी गायली आहेत. नव्वदच्या दशकात कुमार सानू यांनी आपल्या गाण्यांनी देशांतील कोट्यवधी लोकांना वेड लावलं होतं.