दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ‘तांडव’ सीरिजचा वाद अद्याप संपलेला नाही. हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी ही सीरिज वादात अडकली आहे. उत्तर प्रदेशात अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह निर्माते-दिग्दर्शक, लेखकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता मुंबईतही घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआऱ दाखल करण्यात आला आहे.

‘तांडव’ वेब सीरिजद्वारे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत घाटकोपर येथील पोलीस ठाण्यात सीरिज विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तांडव सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोलंकी, अॅमेझॉन प्राइमच्या प्रमुख अपर्ण पुरोहीत, अभिनेता सैफ अली खान आणि सीरिजमधील इतर कलाकारांची नावे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आली आहेत.

भाजपा आमदार राम कदम यांनी ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये अखेर सैफ अली खानसोबतच अॅमेझॉन आणि तांडव सीरिजच्या टीम विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे असे म्हटले आहे.

यापूर्वी राम कदम यांनी सोशल मीडियाद्वारे या सीरिजवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. “चित्रपट किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का केला जातो. अलिकडचेच उदाहरण घ्यायचे झाले तर नवीन वेब सीरिज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सीरिजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सीरिजमधून ते दृश्य हटवले पाहिजेत”, असे ट्वीट त्यांनी केले होते.

काय आहे प्रकरण?
‘तांडव’ वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यामध्ये मोहम्मद झीशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात होता. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. मुंबईत या वेबसीरीज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सीरिजच्या संपूर्ण टीमने माफी मागितली होती.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.