बिग बॉसच्या १० व्या सिझनचा विजेता मनवीर गुर्जर बिग बॉस हाऊसमधून बाहेर पडल्यापासून वादातच घेरलेला दिसत आहे. आधी एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरून त्याच्या लग्नाचा विषय निघाला. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत तो शिवीगाळ करतानाही दिसत होता. त्यानंतर आता त्याच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे कळते.

एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मनवीरच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नोएडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जवळपास १००० गाड्या होत्या. त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती आणि स्थानिक लोकांनाही याचा बराच त्रास सहन करावा लागला होता. सदर कार्यक्रमासाठी मनवीरला केवळ ५० गाड्यांची परवानगी मिळाली होती. मिळालेल्या परवानगीच्या तुलनेत अधिक गाड्या आल्याने मनवीर विरुद्ध कलम ३४१ अंतर्गत पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या वृत्तानुसार, मनवीरला यासाठी अटक करण्यात आलेली नाही. केवळ प्राथमिक चौकशी करून त्याला पोलिसांनी सोडले.

दरम्यान, यंदाचा बिग बॉसचा हा सिझन आधीच्या नऊ सिझनपेक्षा बराच वेगळा होता. ज्या १५ स्पर्धकांनी बिग बॉस हाउसमध्ये प्रवेश केला त्यापैकी अर्धेजणे ‘इंडिया वाले’ म्हणजेच ‘नॉन सेलिब्रिटी’ होते. अंतिम फेरीत पोहचलेल्या चार स्पर्धकांपैकी दोन स्पर्धक इंडिया वाले म्हणजेच मनू आणि मनवीर तर दोन सेलिब्रिटी स्पर्धक म्हणजे बानी आणि लोपा हे होते. पण, या चौघांमध्ये अखेर मनवीरनेच बाजी मारली. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी मनवीरला कोणी ओळखतही नव्हते. मनोज कुमार बैसोया म्हणजेच मनवीर गुर्जर हा येथे येण्यापूर्वी एक दुग्ध व्यावसायिक होता. प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवून मनवीर बिग बॉस १०चा विजेता बनला. नाकाच्या शेंड्यावर राग असणारा हा ‘देसी मुंडा’ ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांच्या शर्यतीत सर्वापेक्षा वरचढ ठरला.

मनवीर मुळचा नोएडाचा आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण काहीच योजना न करून आल्याचे मनवीरने सांगितले होते. मी इथे सर्वसामान्य राहणीमान जगेन. ज्यांना माझा अॅटीट्यूड आवडेल त्यांचे मी स्वागत करेन आणि ज्यांना नाही आवडणार त्यांना बाय बाय करेन, असे मनवीरने म्हटले होते. विशेष म्हणजे तो संपूर्ण सिझन तसाच वागला. मोनूसोबतची त्याची मैत्री पूर्ण सिझन चर्चेचा विषय राहिली. त्यांची ही मैत्री शोच्या शेवटपर्यंत टिकली.