सोशल नेटवर्किंगवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात एखादी व्यक्ती सेलिब्रिटी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच व्यक्तींच्या यादीमध्ये आता रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या नावाचा समावेश झाला आहे. रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू यांच्या मधूर आवाजातील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली आहे. या रेकॉर्डींगच्या व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मात्र काही जणांनी या स्टुडिओमधील व्हिडिओची नक्कल करणारे व्हिडिओ शूट करुन ते सोशल नेटवर्किंगवर अपलोड केले आहेत. असाच एक व्हिडिओ शूट करुन सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणाऱ्या एका कॉमेडियनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल नेटवर्किंगवर अनेकदा व्हायरल झालेल्या चांगल्या वाईट गोष्टींवर ट्रोलर्स तुटून पडतात असंच काहीसं झालं आहे रानू मंडल यांनी रेकॉर्ड केलेल्या पहिल्यावहिल्या गाण्याच्या व्हिडिओचे. हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये शूट करण्यात आलेल्या व्हिडिओमधील हिमेशच्या हावभावांची नक्कल करणारे अनेक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आले आहे. असाच एक व्हिडिओ ओडिशामधील एका कॉमेडियनने शूट करुन फेसबुकवर पोस्ट केला. पप्पू पॉम पॉम नावाने फेसबुक पेज असणाऱ्या या कॉमेडियनला हा व्हिडिओ पोस्ट करणं खूपच महागात पडलं आहे. एकीकडे जगभरातून मंडल यांचे कौतुक होत असताना या कॉमेडियनने मंडल यांच्या हवाभावांची नाकरात्मक पद्धतीने मांडणी करत हा व्हिडिओ शूट केला आहे. त्यामुळे फेसबुकवर अनेकांनी याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

आता याच व्हिडिओवरुन निशिंतकोई नागरिक मंच या संस्थेने पप्पू पॉम पॉमविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र नाकारात्मक कमेंट्स आणि होणाऱ्या टीकेनंतर पप्पू पॉम पॉमने मंडल यांची माफी मागितली आहे. ‘मंडल यांच्या गाण्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला होता. तो व्हिडिओ म्हणजे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकारा दिलेली भेट होती. मात्र त्या व्हिडिओवरुन वाद निर्माण करुन आला. तरी माझ्या वागण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो,’ असं पप्पूने सांगितले आहे.

दरम्यान, हिमेश रेशमियाचा ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी रानू मंडल यांनी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. हे गाणे रेकॉर्ड करताचा रानूचा व्हिडीओ हिमेशनेच इन्स्टाग्रामवर शेअर केला आला आहे. या व्हिडीओमध्ये रानू हिमेशसह उभी राहून गाणे गात असल्याचे दिसत आहे. रानू गाणे गात असताना हिमेश बाजूला उभा राहून रानू यांना प्रोत्साहन देताना दिसून आला.

एका वृत्तानुसार रानू यांनी रेकॉर्डींग स्टुडिओमध्ये गायलेल्या त्यांच्या पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने त्यांना जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिले आहे. हिमेशने देऊ केलेले हे रानू स्वीकार करत नव्हत्या. मात्र हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले. इतकचं नाही तर हिमेशने त्यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये नक्की यशस्वी होणार असंही सांगितलं. ‘तुम्हाला बॉलिवूडमध्ये स्टार होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही,’ अशा शब्दांमध्ये हिमेशने त्यांना प्रोत्साहन दिले.